Thursday, 29 August 2013

करार पद्धतीतून झाली प्रगत केळीशेतीकडे वाटचाल

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील कासेगावचे (ता. वाळवा) शिवार लागते. कृष्णाकाठचा हा उसाचा हुकमी पट्टा आता केळी पिकासाठी पुढे येत आहे. उसाचा वाढलेला उत्पादन खर्च व टप्प्याटप्प्याने मिळणारी बिलाची रक्कम हे आर्थिक गणित शेतकऱ्यांना परवडत नव्हते; मात्र तरुणाई शेतीमध्ये राबू लागली. नव्या दिशेने त्यांनी विचार सुरू केला, त्यासाठी केळीचा पर्याय निवडला. निचऱ्याच्या जमिनीची साथ होती. महत्त्वाची गोष्ट होती विक्रीची.

वर्षभर काबाडकष्ट करून पिकवलेला माल विक्री वेळी मध्यस्थ दर पाडून मागू लागले. बाजारपेठेचा अभ्यास नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल व व्यापाऱ्यांची मात्र चांदी झाली. उत्पादन खर्च अनेक शेतकऱ्यांच्या अंगावर आला. मोठ्या प्रमाणात वाढलेले क्षेत्र झपाट्याने कमी झाले. अनेक शेतकऱ्यांनी बागा सोडल्या. पारंपरिक ऊसशेतीच बरी असे वाटू लागले.

सुधारित शेतीचा मिळाला राजमार्ग - हे सर्व खरे असले तरी शेतीत राबणारी तरुणाई प्रयत्नवादी होती. केळी लागवडीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी स्थानिक बाजारपेठेचा नाद सोडला. अकलूज, टेंभुर्णी येथील व्यापाऱ्यांना भेटून माल घेण्यासाठी पाचारण केले, त्यामध्येही अनेक अडचणी आल्या. दरम्यान, राज्याचे माजी कृषी सचिव नानासाहेब पाटील यांच्याशी चर्चा केली. विक्री व्यवस्थेची फरपट थांबली पाहिजे, शेतकऱ्यांना हक्काचे पैसे विश्‍वासाने मिळाले पाहिजेत, अशी भावना त्या वेळी व्यक्त झाली. त्यातून पुढे गुजरातमधील एका कंपनीशी चर्चा झाली.

संबंधित कंपनीने शेतकऱ्यांसोबत करार करण्यापूर्वी आपल्या अटी, हमीभावाची संकल्पना, मालाची गुणवत्ता, तांत्रिक मार्गदर्शन आदी गोष्टी शेतकऱ्यांसमोर मांडल्या. कंपनीने पॅक हाऊसची उभारणी, कार्यालय, केळी काढणीसाठी सुमारे शंभर मजूर अशी सुविधाही कासेगाव येथे उभारली.

आधी होतो करार, मगच शेती कंपनी केळी उत्पादकांकडून करार पत्र भरून घेते, त्यामध्ये प्रति टन सहा हजार रुपये हमीभावाची बांधिलकी असते. करार केल्यानंतर उत्पादित माल कंपनीला देणे बंधनकारक असते. केळफूल आल्यानंतर घडावरील बहुतांश कामे कंपनीच्या प्रतिनिधींकडून होतात. त्याचा खर्चही कंपनी करते. परिपक्व झालेला माल काढण्यासाठी कंपनीचे मजूर असतात. माल बांधावर पोच करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची असते. तेथून पुढे हा शेतीमाल पुढील प्रक्रियेसाठी कंपनी रवाना करते.
खरेदी- विक्री संघाची स्थापना - कासेगाव येथील शेतकऱ्यांनी कृष्णामाई फळे, फुले, भाजीपाला उत्पादक संघाची स्थापना केली आहे. 13 जणांचे संचालक मंडळ असून 103 सभासद आहेत. त्यातील सुमारे 72 शेतकरी केळी शेतीत असून, सध्या त्यांची शेती विविध टप्प्यांत आहे. प्रत्येकाचे दोन ते चार एकर असे केळीचे क्षेत्र आहे.

1) संबंधित कंपनी करार थेट संस्थेशी, तर संस्था आपल्या सभासदांसोबत करते. संघासाठी कंपनीकडून दोन टक्के व्यवस्थापन खर्च दिला जातो.
2) कंपनीच्या प्रतिनिधींकडून लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले जाते.

सुधारित केळीशेतीने हे बदल साधले - कंपनीतर्फे गुजरातमधील तसेच कंधार आदी ठिकाणचे केळीचे प्लॉट पाहण्याची संधी या शेतकऱ्यांना मिळाली,
त्यातून लागवड व्यवस्थापनात बदल करणे शक्‍य झाले.
- उतिसंवर्धित व ग्रॅंड नाईन रोपांची लागवड होते.
- लागवडीचे अंतर सात बाय पाच फूट ठेवले आहे. किडी- रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच
मशागतीची कामे सुलभ करण्याच्या दृष्टीने हे अंतर आठ बाय पाच फूट करण्याचे नियोजन आहे.
- लागवडीचे मे व ऑगस्ट असे दोन हंगाम निवडले आहेत, त्याचबरोबर सुमारे दोन वर्षांत तीन पिके घेण्याचा प्रयोगही एक एकर क्षेत्रावर घेण्यात आला आहे.
- पूर्वी प्रति घडाला सुमारे 12 फण्या ठेवल्या जायच्या. एक ओळ घड आठ फण्यांपर्यंतच ठेवण्याचा प्रयोग केला. त्यात 21 ते 25 दिवस आधी माल काढणीस आल्याचे आढळले; तसेच 12 फण्या व आठ फण्या यांचे वजनही जवळपास तेवढेच असल्याचे दिसून आले.
- सध्या सर्व शेतकऱ्यांनी शंभर टक्के ठिबक सिंचन केले आहे.
- जमिनीतून खते देण्याबरोबरच विद्राव्य खतांचा वापरही चांगल्या प्रकारे केला जातो.
- प्रति घडाचे वजन सरासरी 25 पासून ते 30 किलोपर्यंत मिळाले आहे.
- घड झाकण्यासाठी स्कर्टिंग बॅगचा वापर होतो.
- दरवर्षी पुढील पीक घेण्यापूर्वी माती व पाणी परीक्षण करून त्याआधारेच नियोजन केले जाते.
- सभासद शेतकऱ्यांना मिळालेले सरासरी उत्पादन - एकरी - 30 ते 35 टन, कमाल 42 टनांपर्यंतही मिळाले आहे.
- मिळणारा दर - लोकल मार्केटपेक्षा किमान एक रुपया अधिक दर दिला जातो. दर पाच दिवसांनी हे दर अपडेट केले जातात. त्यासाठी कंपनी व संघ यांचे प्रतिनिधी एकत्र बसून बाजारपेठेतील दरांचा आढावा घेतात व त्याप्रमाणे दर निश्‍चित करतात. गेल्या आठवड्यात प्रति टन 11 हजार 250 रुपये दर मिळाला. गेल्या दोन वर्षांत हा दर आठ हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत मिळाला आहे.

केळी उत्पादक व कंपनीचे अधिकारी यांच्यात संवाद साधण्याचे काम खरेदी- विक्री संघाचे संचालक मंडळ करते. त्याद्वारे त्या दिवशीच्या कामाचे नियोजन ठरते. शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास त्यांच्या बागेत जाऊन त्यांची अडचण दूर केली जाते.


केळी करार शेतीतून काय बदल झाले? प्रचलित पद्धती
- लागवड तंत्रज्ञान पारंपरिक होते.
- दर्जा व उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शनाचा अभाव होता.
-- व्यापारी शोधण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ व्हायची.
- दरांबाबत शाश्‍वती नव्हती.
- खासगी व्यापारी दर पाडून मागायचे.
- कच्चा माल काढल्यामुळे वजनात घट, पर्यायाने शेतकऱ्यांचा तोटा व्हायचा.
- शिल्लक माल ठरलेल्या दरापेक्षा कमी दराने घेत.

करार शेती - सुधारित तंत्रज्ञान व मार्गदर्शन उपलब्ध झाले.
- त्याप्रमाणे
- दरांबाबत निश्‍चिती झाली, त्यामुळे नुकसान वाचले.
- वजनात पारदर्शकता आली.
किरण विलासराव पाटील,
अध्यक्ष, खरेदी- विक्री संघ (मो. 9881804545)

व्यापाऱ्यांची मानसिकता व त्यांच्या अनुषंगाने होणाऱ्या विक्री व्यवस्थेच्या त्रासाला कंटाळून केळी लागवड बंद केली होती; परंतु करार शेतीतून विश्‍वास वाटला व नव्याने ही शेती सुरू केली. सध्या पाच एकर केळी आहे. आमचा माल संबंधित कंपनीद्वारे निर्यात केला जातो.
प्रशांत शिवाजीराव पाटील (मो. 7588167207)

सन 2005 पासून केळी लागवडीस सुरवात केली. व्यापाऱ्यांकडून खरेदी वेळी अडवणूक व्हायची, त्यामुळे संघटितरीत्या करार शेतीचा मार्ग स्वीकारला. सध्या माझ्याकडे आठ एकर केळी आहे. हे पीक फायदेशीर करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे.

प्रमोद रामचंद्र पवार (मो. 9175018267)
प्रकाश राजाराम पाटील (मो. 9767311250)

No comments:

Post a Comment