Thursday, 29 August 2013

प्रक्रिया बायोगॅस निर्मितीची

बायोगॅस संयंत्रामध्ये वायू तयार होण्याचा दुसरा टप्पा म्हणजे जे चोथा-पाणी वेगळे होते, त्या चोथ्यामधला म्हणजेच जैवभारामधला पिष्टमय पदार्थ किंवा शर्करा यांचे विघटन होते. हा काही संयुक्त शर्करांचा बंध असतो. ज्याला शास्त्रीय परिभाषेत "पॉलिसॅक्राईड' असे म्हणतात. या संयुक्त शर्करांचे जिवाणूंच्या साह्याने विघटन होऊन एकल शर्करा (मोनो सॅकराईड) तयार होतात. यांच्याच विघटनाच्या पुढच्या टप्प्यात ऍसिटिक ऍसिड (H3CooH) तयार होते. ऍसिटिक आम्ल तयार होत असल्याने या टप्प्याचे नाव "ऍसिडोजेनेसिस' असे आहे. यातूनच या अभिक्रियेत भाग घेणाऱ्या जिवाणूंचे नाव "ऍसिडोजेनिक बॅक्‍टेरिया' असे आहे.

यापुढील टप्पा म्हणजे तयार झालेल्या ऍसिटिक आम्लाचे जिवाणूंच्या साह्याने परत विघटन होऊन वायूंची निर्मिती होते. याआधी म्हटल्याप्रमाणे ऍसिटिक ऍसिडचे रासायनिक गुणसूत्र हे (CH3CooH) असे आहे. मात्र याच्या विघटनात त्यातील सर्वांत शेवटी असलेला हायड्रोजनचा रेणू हा पहिल्या CH3 ला जाऊन मिळतो आणि तयार होतो CH4 म्हणजेच मिथेन वायू आणि उरलेला Coo पासून तयार होतो CO2 म्हणजेच कार्बन- डाय- ऑक्‍साइड हा वायू. या दोन वायूंच्या निर्मितीत मिथेन वायूची मात्रा जास्त असल्याने या अभिक्रियेस "मिथेनोजेनेसिस' म्हणतात आणि भाग घेणाऱ्या जिवाणूंचे नाव "मिथेनोजेनिक बॅक्‍टेरिया' असे असते. वरील उदाहरण देण्याचे मुख्य कारण हे, की पदार्थांपासून वायूनिर्मिती कशी होते ते समजावून घेणे हा उद्देश असल्याने त्यातील सुटसुटीत अभिक्रिया मुद्दाम दिली आहे. याव्यतिरिक्त अन्य अभिक्रिया होतच असतात. ही रासायनिक अभिक्रिया शास्त्रीय परिभाषेत खालीलप्रमाणे लिहिता येते ः
CH3CooH मिथेनोजेनिक CH4 + CO2
ऍसिटिक ऍसिड बॅक्‍टेरिया मिथेन + कार्बन- डाय- ऑक्‍साइड

बायोगॅसमध्ये मिथेन आणि कार्बन- डाय- ऑक्‍साइड हे फक्त दोनच वायू निर्माण होतात असं नाही, तर एकूण निर्माण वायूंमध्ये इतर वायूंचे प्रमाण हे अगदी पी.पी.एम. (पार्टिकल्स पर मिलियन) तत्त्वावर मोजले जातात. हे आहेत हायड्रोजन सल्फाईड (H2S), सल्फर डाय ऑक्‍साइड (SO2), आणि अमोनिया (NH3). हे तीनही वायू विषारी आहेत आणि श्‍वसनात प्रमाणापेक्षा जास्त आल्यास गंभीर परिस्थिती उद्‌भवू शकते. याच्याच जोडीने जैववायूमध्ये अजून एक जोडीदार यांना सामील असतो आर्द्रता (मॉईश्‍चर). मात्र हे प्रमाण "पीपीएम'मध्ये मोजण्याचेच. ज्यांच्याकडे गोबरगॅस संयंत्र आहे किंवा होते, त्यांना या पाण्याचे प्रमाण माहिती असते, कारण बऱ्याच वेळेला वायूधारक नळीतून त्यांना ते काढून टाकावे लागते. वायूवाहक नळीत पाणी थेंबाथेंबाने साचणे जर वाढले तर त्यामुळे वाहत जाणाऱ्या जैववायूला चक्क अडथळा ठरते. याचे एकमेव कारण जैववायू तयार होत असताना असलेली स्थिती हेच आहे.

"एनटीपी' म्हणजे अगदी सामान्य वातावरण आणि त्याच तापमानाला तयार होत असलेला हा जैववायू. मग त्यावरचा दाब किती, असा जर प्रश्‍न पडला तर त्याचं उत्तर प्रेशर गेज लावून मिळत नाही. कारण हा दाब त्याहीपेक्षा कमी असतो. हा मोजायचा ठरवला तर वापरायचा "बॅरोमीटर'. ही एक साधी इंग्रजी "U` या अक्षराप्रमाणे असलेली एक नळी, त्यात भरलेलं पाणी किती मिलिमीटरनं विस्थापित झालं तो आला त्या वायूवरचा दाब. सर्वसामान्य परिस्थितीत जैववायूवराचा दाब हा सहा ते नऊ इंच वॉटर कॉलम इतका किंवा 150 ते 270 मिलिमीटर एवढा संयंत्राच्या प्रकारानुसार असतो आणि म्हणून हा वायू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फार लांब अंतर वाहून नेता येत नाही. कारण त्याच्या वहनामुळे त्यावरील दाब उतरतच जातो आणि शेगडीमध्ये पुरेशा दाबाने त्याचे ज्वलन होत नाही. हे झाले जैववायू संयंत्रामधले प्रमुख टप्पे आणि त्याचे सर्व घटक नेमके लक्षात यावेत यासाठी खालील आकृतीने त्याचे पुरेसे स्पष्टीकरण होईल.

बायोगॅस प्लांटची आकृती निर्मितीसाठी आवश्‍यक घटक 1) पाचक टाकी 1) पिष्टमय पदार्थ/शर्करा
2) वायूधारक टाकी 2) वातावरण
3) इनलेट 3) जिवाणू (बॅक्‍टेरिया)
4) आऊटलेट 4) तापमान (25 अंश C)
5) गॅस कॉक 5) सामू (Ph) @ 7

बायोगॅस बांधताना - भारतामध्ये आणि भारताबाहेरही आज रोजी आणि यापूर्वी अनेक जणांनी अनेक ठिकाणी "जैववायू' अर्थात बायोगॅस यावर काम केले आहे. त्यामुळे सुमारे 40 ते 50 वेगवेगळ्या प्रकारांची संयंत्रे उपलब्ध आहेत. त्यांची नेमकी निवड ही आपण करताना आपली गरज काय, आपण बांधकाम कुठे करणार किंवा त्यामध्ये कोणते पदार्थ वापरणार हे लक्षात घ्यावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तयार होणाऱ्या जैववायूचा नेमका वापर कशासाठी करणार, अशा सर्व प्रश्‍नांच्या एकत्रित उत्तरात दडलेली असते.

अगदी वैयक्तिक वापरापासून ते सुमारे 12-15,000 घनमीटर एवढ्या आकारमानाची जैववायू संयंत्रे देश-विदेशात स्थापित आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर 1000, 1500 लिटरच्या पीव्हीसी टाक्‍या एकमेकांत उलटसुलट बसवून आपण आपल्या घरासाठी जैववायू संयंत्र निर्मिती करू शकतो आणि तत्त्वावर शेतामध्ये मक्‍याची लागवड करून एक ते दोन मेगावॉट एवढ्या मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती करू शकतो. अशा पद्धतीचे व्यापारी तत्त्वावर काम करणारे काही परदेशी प्लांट आढळून येतात. ही किमान ते कमाल श्रेणी अवलंबित असताना आज त्यातील वायूनिर्मितीची प्रक्रिया मात्र आता वर्णन केली अशीच असते. थोड्याफार फरकाने त्यामध्ये कमी-जास्त तांत्रिक सुधारणा आढळून येतात. काही व्यावसायिक प्रणाली तर अगदी कायमस्वरूपी तापमान नियंत्रित राहावे म्हणून विशिष्ट रचनाही उभारतात. गोबरगॅस संयंत्रात दिवसातून एक किंवा दोन वेळा शेणकाल्याचा भरणा होत असेल तर अशा मोठ्या क्षमतांच्या बायोगॅस प्लांटमध्येही अगदी प्रतिमिनिटाला भरणा केला जातो. मात्र अशा सुधारणा करत असताना "वायू उत्पादन कमी वेळात जास्त निर्मिती' अशा स्वरूपाचे असल्याने त्यातील विविध घटकांची विशिष्ट वेळी नोंदी ठेवण्याची गरजही आवश्‍यक असल्याने ही प्रक्रिया जास्त तांत्रिक अशी असते.

बायोगॅसला ताव कमी का? ही प्रक्रिया समजून घेताना अजून एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे या वायूच्या एकूण घनभारापैकी (व्हॉल्यूम) सुमारे 60 टक्के एवढा मिथेन असतो. उरलेल्या 40 टक्के भागात कार्बन- डाय- ऑक्‍साइड असतो. इथे हा मुद्दा त्यामुळे महत्त्वाचा ठरतो, कारण गोबर गॅसचा वापर स्वयंपाकासाठी करणाऱ्या महिला नेहमी अशी तक्रार करतात, की त्यांच्या गोबरगॅसला ताव नाही आणि याचे मुख्य कारण त्यामधील वायूंची असलेली टक्केवारी हेच आहे. मिथेन हा वायू मुळात "इनर्ट गॅस' किंवा नोबल वायूंच्या जातकुळीतला आणि पेटणारा असा वायू, त्याचे बायोगॅसमधील प्रमाण सुमारे 60 टक्के. त्याच्याच सोबतीने एकूण घनभारापैकी 40 टक्के एवढे आकारमान असलेला कार्बन- डाय- ऑक्‍साइड वायू हा मुळात अग्निशामक वायू. म्हणूनच बायोगॅसच्या ज्वलन प्रक्रियेमध्ये 60 टक्के मिथेन जळण्याचा प्रयत्न करतो, तर त्यातील 40 टक्के कार्बन- डाय- ऑक्‍साइड वायू त्याला विझवायला पाहतो. सरतेशेवटी 20 टक्के मिथेनच पेटलेला असतो आणि म्हणून या इंधनाचा ताव कमी.

परदेशातील बायोगॅसचा अवलंब - परदेशामधील जर्मनी, स्वीडन या देशांमध्ये जैववायू विषयावर बरेच काम झाले आहे आणि तेथील वायूनिर्मिती ही मुळामध्ये जास्त करून वीजनिर्मितीसाठी वापरली जाते. अगदी 12,000 घनमीटर प्रतिदिवस एवढ्या विशाल प्रमाणावर एवढा वायू निर्माण झाला, तर त्यावर सुमारे एक मेगावॉट एवढी वीजनिर्मिती होते. त्याचा अंदाजित खर्चही सुमारे सात ते आठ कोटींच्या घरात जातो. यासाठी विशेष करून मका, शुगरबीट, गोड ज्वारी या इंधन पिकांची लागवड केली जाते.

1 comment: