Friday, 16 August 2013

पारंपरिक चिन्हे सांगतात पावसाचा अंदाज

एककेंद्रीय असलेल्या जिवांना स्पर्शातून ज्ञान मिळते. पंचमहाभूतात वायू त्याला कारणीभूत असतो. समजा, भूकंप होणार असेल, तर भूकंपाच्या लहरींचे ज्ञान एकेंद्रीय असलेल्या प्राण्यांना त्यांच्या पायांच्या स्पर्शातून, सरपटणारा प्राणी असेल, तर बरगड्यातून किंवा ज्यांचा पाठीचा कणा जमिनीला समांतर असतो, त्या प्राण्यांना जास्त लवकर होते.

ज्यांना खूर नाही असे प्राणी उदा. कुत्रा, हत्ती, वाघ, सिंह इत्यादींना याचे ज्ञान लवकर होते. थोडक्‍यात, ज्या प्राण्यांच्या शरीराचा भाग जमिनीच्या जवळ अधिक असतो, त्यांना येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचे ज्ञान लवकर होते. साप हा जमिनीवर सरपटत असल्याने त्याला भूकंपाच्या लहरींचा अंदाज लवकर येतो. मनुष्यप्राणी असा आहे, की त्याच्या जिवाला धोका असेल किंवा त्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर त्यालाही नैसर्गिक आपत्तीचे ज्ञान लवकर प्राप्त होऊ शकते.

पावसाचे ज्ञान मेंढ्यांना पावसाचा हमखास अंदाज येतो; तसेच गाढव, मुंगी, चतुर, वाळवी, कावळा, चिमणी यांनाही 24 तासांत येणाऱ्या पावसाचा अंदाज बरोबर समजतो. पावसाची शक्‍यता असेल तर मेंढरांना वास येतो. मेंढरं जमीन हुंगायला लागतात. त्यानंतर गोलाकार उभे राहून आतील बाजूला तोंड खुपसताना दिसतात. गाढवाला पाऊस येण्याआधी वास येतो, तेव्हा ते आपले कान खाली करते.

प्राण्यांप्रमाणेच आदिवासी लोकांनाही वास येतो. हे लोक एक दिवस आधी पावसाच्या अंदाजाबाबत सांगतात. जमिनीचे तापमान वाढते, आर्द्रता वाढून जमीन ओली होते, तेव्हा भाजलेल्या बटाट्यासारखा वास येतो, असा वास यायला लागल्यावर त्यानंतर पाऊस पडतो, असे या लोकांचे म्हणणे असते.

पाऊस पडण्याआधी भौतिक चिन्हे अगोदर दिसतात, त्यानंतर जैविक चिन्हे दिसतात. भौतिक चिन्हे 17 आहेत. पावसाची गर्भधारणा होताना जैविक चिन्हे आधी दिसतात, भौतिक चिन्हे नंतर दिसतात. माणसांनाही भौतिक किंवा जैविक चिन्हे दिसतात. त्यानुसार 48 किंवा 72 तासांतील पावसाचा अंदाज देता येऊ शकतो.

जैविक चिन्हे ग्या ज्या वारूळ करून राहतात, त्यांना पावसाच्या आदानाचा (गर्भधारणेचा) अंदाज आधी येतो. मुंग्या वारुळाचे तापमान आणि आर्द्रता स्थिर ठेवण्याचे (वातानुकूलन) काम करतात. ते करण्याकरिता त्या वारुळाच्या भिंतीतील आर्द्रतेत बदल करतात. मातीचे कण वाळविण्याकरिता किंवा थंड करण्याकरिता मुंग्या त्यांना वर आणतात. काही वेळेला जवळपासचा लाकडी भाग, गवत वारुळावर आणून ठेवतात. ज्या वेळी जमिनीत आर्द्रता वाढून पाणी सुटायला लागते, त्या वेळी काळ्या मुंग्यांची जमिनीत हालचाल सुरू होते. पाणी लागल्याने मुंग्यांची अंडी नासतात, त्यामुळे त्या अंडी वर आणायला लागतात. वनस्पतींना फुले येणे, त्यांची फळे खाली पडणे, या अवस्थाही पाऊस येण्याचे संकेत देतात.

पाऊस पडण्याआधी जमिनीचे तापमान वाढायला लागते, त्याचा वास काही प्राण्यांना येतो. हवेची पोकळी व्हायला लागते. त्याचा अंदाज तिथे उडणाऱ्या पक्ष्यांना व कीटकांना येतो. उदा. कावळा नेहमी तीस किंवा त्याहून थोड्या कमी- अधिक फूट उंचीवर उडतो, मात्र पावसाचा अंदाज असला तर तो नेहमीच्या उंचीपेक्षा खालच्या उंचीवरून उडताना दिसतो. म्हणजे सकाळी तो आपल्यापासून पंधरा ते वीस फूट अंतरावर उडत असेल तर तेव्हापासूनच्या बारा तासांत पाऊस पडण्याची शक्‍यता असते. दर तासाला कावळा आपली उडण्याची उंची एक- एक फुटाने कमी करतो. टोळ किंवा चतुर साधारणतः आठ फुटांवर उडताना दिसतात, त्यानंतर आठ तासांत पाऊस पडण्याची शक्‍यता असते. दर तासाला तेही उडण्याची उंची एक- एक फूट कमी करतात.

पाऊस येण्याचा अंदाज असेल तर काही जनावरांना वाऱ्याचा आवाज कळतो, काहींना रंग पद्धतीचा तर काहींना तापमानामधील बदल, काहींना वास तर काहींना चव कळते. जसे की बारीक कीटक (उदा. डास, मच्छर) वनस्पतींच्या शेंड्यावरती येऊन बसतात.

पाऊस येण्याच्या तीन दिवस आधी बकरी कोवळा पाला खात नाही, ती फक्त शेंडे कुरतडते. कोवळा पाला न खाण्याचे कारण म्हणजे, त्याच्या रसायनात बदल होतो, त्याचा वास येतो, त्यामुळे त्या ठिकाणी बारीक कीटक येतात. ते खायला सरडे येतात. सरडे आकाशाकडे तोंड करून बघायला लागतात. काही किडी रंगाकडे आकर्षित होतात, त्या खायला मिळाव्या म्हणून सरडा आपल्या डोक्‍याचा रंग बदलतो. त्यानंतर दोन- अडीच तासांत पाऊस येतो.

पावसाचा नेमका अंदाज बांधणे शक्‍य नाही, कारण जमिनीचा सव्वा किलोमीटर त्रिज्येचा प्रत्येक तुकडा हा पावसाची गर्भधारणा करतो, त्यामुळे त्या ठिकाणी पाऊस पडतो. ही गर्भधारणा ज्या चंद्र नक्षत्रात होते, त्या नक्षत्रापासून पंधराव्या पक्षात चंद्र ज्या वेळी पुन्हा त्या नक्षत्रात येतो, त्या वेळी तिथे पाऊस पडतो. हा पाऊस 24 तास पुढे- मागे पडू शकतो.

नक्षत्र आणि पाऊसमान एकूण 27 नक्षत्रं आहेत; परंतु या नक्षत्रांचा प्रत्यक्ष संबंध त्या विभागाशी नाही. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळे उत्तर- दक्षिण ध्रुव तयार होतात.
विषुववृत्तावर 360 अंशांचा सरफेस येतो, त्याचे 27 भाग हे विशिष्ट गुणवत्तेच्या लहरी असताना तिथे निर्माण होतात. त्या गुणवत्तेच्या लहरींना नक्षत्रांचे नाव देण्यात आले आहे, त्यामुळे गुणवत्तेच्या लहरींना खूप महत्त्व आहे.

घोडा, कोल्हा, बेडूक, मेंढा, मोर, उंदीर, म्हैस, गाढव आणि हत्ती ही नक्षत्रांची वाहने आहेत. सूर्य ज्या वेळी एखाद्या नक्षत्रात प्रवेश करतो, त्या वेळी चंद्र त्याच्यापासून कितव्या नक्षत्रात आहे, त्याच्यावर वाहन ठरते. समजा, चंद्र त्याच नक्षत्रात असेल तर घोडा वाहन येईल, पुढच्या नक्षत्रात असेल तर कोल्हा वाहन येईल.
नक्षत्रांची वाहने व पाऊसमान

ज्या नक्षत्राचे वाहन हत्ती असते, त्या नक्षत्रात भरपूर पाऊस पडतो. पूर येऊन त्या पुरातून हत्ती पलीकडे जाईल, असेही म्हटले जाते. तसेच म्हैस वाहनाचेदेखील असते.

बेडूक वाहन असलेल्या नक्षत्रात पाऊस इतका फुगतो, की बेडकाची पिल्ले त्या पावसाबरोबर वाहत जाऊन दुसरीकडे पसरतात.

घोडा वाहन असलेल्या नक्षत्रात जो पाऊस येतो, तो ज्या मार्गाने येईल, तो संबंध मार्ग भिजवीत येईल, असा समज आहे.

मोर ज्याप्रमाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, तसेच हे वाहन असलेल्या नक्षत्राचा पाऊसही एका ठिकाणी पडतो, तर दुसऱ्या ठिकाणी (मधला भाग न भिजविता) पडत नाही.

उंदीर वाहन असलेल्या नक्षत्राचा पाऊस हा स्थानिक असतो, तो सव्वा ते दीड किलोमीटर अंतरातच पडतो.

कोल्हा वाहन हे फसवे असते. ढग येतात, पाऊस पडेल असे वातावरण तयार होते, प्रत्यक्षात पाऊस पडत नाही.

गाढव वाहन असलेल्या नक्षत्रात इतका पाऊस पडतो, की गवताच्या ठोंबाला कोंब फुटतात.

मेंढा वाहन असते, त्या नक्षत्रात सगळ्यात कमी पाऊस पडतो, मेंढ्याच्या अंगावरील लोकरीला पाणी लागले की त्याला सर्दी होते, त्यामुळे या वाहनाचा पाऊस कमी असतो, असे म्हटले जाते.

No comments:

Post a Comment