Thursday, 29 August 2013

मार्केट ओळखून केली कलिंगडाची यशस्वी शेती

अलीकडील काळात शेतकरी वर्षभरातील सण समारंभांचा विचार करून पिकांचे नियोजन करताना दिसतात.
पुढील वर्षी किती क्षेत्रावर कोणते पीक कधी लावायचे आहे हे आधीच ठरवून त्याप्रमाणे उत्पादन घेतात.
जालना जिल्ह्यात चित्रवडगाव (ता. घनसावंगी) येथील गंगाधर अप्पासाहेब सोसे गावचे सरपंच आहेत.

ग्रामपंचायतीची कामे सांभाळून त्यांनी शेतीत लक्ष घातले आहे. त्यासाठी सकाळ व संध्याकाळचा वेळ ते शेतीसाठी देतात. सोसे कुटुंबाची सुमारे 60 ते 65 एकर शेती आहे. त्यामध्ये कपाशी, सोयाबीन, ऊस, उडीद-मूग आदी पिके घेतली जातात. सुमारे पंधरा ते वीस एकर क्षेत्रावर असलेले उसाचे क्षेत्र पुरेशा पाण्याअभावी त्यांनी दोन वर्षांपूर्वी थांबवले. मात्र यंदा थोडा समाधानकारक पाऊस असल्याने पुन्हा या पिकाचे नियोजन केले आहे. त्यांचे बंधू व आई-वडील हे शेतीत राबतात.
सोसे यांनी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून कलिंगड पिकाची कास धरली आहे. अर्ली खरीप तसेच उन्हाळी अशा दोन हंगामांत ते या पिकाची लागवड करतात. रमझान महिना आणि त्या काळातील मागणी लक्षात घेऊन कलिंगडाचे नियोजन ते करतात. दरवर्षी चांगले उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे या पिकातील त्यांचा आत्मविश्‍वास वाढीस लागला आहे.

यंदाचे प्रातिनिधिक उदाहरण मुस्लिम धर्मीयांसाठी रमझान महिन्याच्या सणाचे मोठे महत्त्व असते. साहजिकच विविध फळांची बाजारपेठेत गर्दी होते. ही संधी सोसे यांनी साधली आहे. दरवर्षी 15 ते 20 मेच्या सुमारास ते कलिंगडाची लागवड करतात. यंदा मात्र नियोजन थोडेसे पुढे गेल्याने ही लागवड मे महिन्याच्या अखेरीस झाली. ही लागवड मेच्या पंधरवड्यात झाली तरच रमझान सणाच्या काही दिवस आधी फळे बाजारात आणून त्यांना दर चांगले मिळतात.
सण तोंडावर असतानाच्या काळात हे दर तितके चांगले मिळत नाहीत असे सोसे यांचे म्हणणे आहे.
यंदा त्यामुळेच मागील वर्षीच्या तुलनेत त्यांना दर कमी मिळाला.

अर्ली खरीप हंगामात लागवड करतेवेळी पाण्याची उपलब्धता व अन्य पिकांतील कामांची वेळ यांची सांगड घालावी लागते. मराठवाड्याचा विचार करता जास्त उष्णतामान असताना वेलीच्या वाढीवर व पर्यायाने पुढे उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा वेळेस विशेष काळजी घ्यावी लागते, असे सोसे सांगतात.
कलिंगडाचे व्यवस्थापन सोसे यांची जमीन मध्यम स्वरूपाची व निचरा होण्याजोगी आहे. लागवडीसाठी ते सरी पद्धतीचा वापर करतात. यंदाच्या वर्षी त्यांनी लागवडीसाठी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच जमीन नांगरून व वखरांच्या दोन ते तीन पाळ्या घालून तयार केली. त्यात शेणखत तीन ट्रॉली वापरले. जमीन व्यवस्थित मिश्रणयुक्त व भुसभुशीत करून घेतल्यानंतर लागवडीपूर्वी ठिबक संच अंथरून घेतले. सहा x एक फूट अंतरावर रोपांची लागवड केली. रोपे उगवून आल्यानंतर त्यास एकरी दोन बॅग 10 :26 :26 व पोटॅश दिले. अलीकडील काळात शेतकऱ्यांनी विद्राव्य खतांच्या वापरावर विशेष भर दिला आहे. त्यानुसार सोसे यांनीही त्यांचा वापर ठिबक सिंचनाद्वारे केला. तीन वेळेस खुरपणी व निंदणी केली. या वर्षी सतत रिपरिप पाऊस पडत राहिल्याने तणांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे खुरपणी अधिक करावी लागली. ढगाळ वातावरणामुळे या वर्षी रोग व किडींचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा जास्त आढळून आल्याने फवारण्यांच्या संख्येतही वाढ झाली. लागवडीनंतर दोन दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारे एक ते दोन तास पाणी दिले. त्यानंतर आठ दिवसांच्या फरकाने पाण्याच्या पाळ्या सुरू ठेवल्या. जून व जुलै महिन्यांत पावसाची रिमझिम सुरू असल्याने पाणी देण्याची गरज भासली नाही.

संततधार पाऊस सुरू असल्याने मालाच्या गुणवत्तेला थोडा फार फटका बसून जवळपास चार ते पाच टन माल खराब झाला. एकूण उत्पादन सुमारे 17 ते 18 टन मिळाले. कलिंगडाला प्रति किलो सात ते साडेसात रुपये दर मिळाला.

मार्केट औरंगाबाद हे सोसे यांना जवळचे मार्केट आहे. मात्र त्या तुलनेत मुंबईच्या वाशी येथील बाजारपेठेत कलिंगडाला चांगली मागणी असल्याने तेथेच माल विकला जातो. पक्वता व रंग यांचा अंदाज घेऊन फळाची काढणी करण्यात येते. फळाचा आकार व वजनाप्रमाणे प्रतवारी करून टेम्पोद्वारे फळे पाठविण्यात येतात. मुंबईला फळविक्रीसाठी आपण स्वतः जात असल्याचे सोसे सांगतात. खर्च वजा जाता सुमारे 90 हजार ते एक लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे.

दरवर्षी कलिंगड होते किफायतशीर शेतीत हवामान या घटकाची मोठी भूमिका असते. मागील वर्षी तर जालना जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती होती. तरीही उपलब्ध पाणी व ठिबक सिंचनाच्या आधारे आपण कलिंगड घेतल्याचे सोसे यांनी सांगितले.
मात्र यंदाच्या उन्हाळी हंगामात पाण्याअभावी हे पीक घेणे त्यांना शक्‍य झाले नाही. अर्ली खरीप लागवडीतील कलिंगडाचे त्यांना दरवर्षी एकरी 15 ते 18 टनांपर्यंत उत्पादन मिळते. उन्हाळी हंगामात ते तुलनेने कमी असते.
मागील वर्षी रमझान काळात दर किलोला नऊ रुपयांपर्यंत मिळाला होता.
फळाची गुणवत्ता चांगली येण्यासाठी शेणखताचा वापर दरवर्षी एकरी चार ते पाच ट्रॉली करतो. घरी चार ते पाच बैल, पाच म्हशी व अन्य गाई मिळून दहा जनावरे आहेत. गरजेनुसार शेणखत विकतही घेतले जाते.
कलिंगडाचे वजन सुमारे नऊ ते दहा किलो व अगदी 15 किलोपर्यंतही मिळते. आता कलिंगडानंतर त्या जागी कांदा पिकाचे नियोजन केले आहे.
अन्य पिकांच्या उत्पादनाबाबत सोसे म्हणाले, की बीटी कापसाचे एकरी 12 ते 13 क्विंटल, सोयाबीनचे आठ ते 10 क्विंटल उत्पादन मिळते. अन्य ठिकाणी दोन ते तीन गुंठे जमीन खरेदी करून तेथे विहीर खोदली आहे.
तेथून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावरून पाइपलाइन करून पाण्याची उपलब्धता केली आहे.
हवामानाच्या परिस्थितीनुसार पिकाचे व्यवस्थापन अवलंबून राहते. मात्र मागील पाच ते सहा वर्षांचा अनुभव आपल्याला उपयोगी पडत असल्याचे सोसे यांचे म्हणणे आहे.

संपर्क - गंगाधर सोसे, 9764514490, 9405527200

No comments:

Post a Comment