Thursday, 29 August 2013

पीक पोषणावर भर देत फुलवली उत्कृष्ट संत्रा बाग

यवतमाळ जिल्ह्यातील नागपूर- तुळजापूर महामार्गापासून सुमारे पाच कि.मी. अंतरावर लोणी गाव वसले आहे. कपाशी, सोयाबीन व काही प्रमाणात ऊस परिसरात घेतला जातो. शिवारातील सुमारे 900 एकरांपैकी 200 एकरांवर संत्रा बाग आहे. देवगाव तलावातून मिळणारे कालव्याचे पाणी आणि विहीर ही भागातील सिंचनाची साधने आहेत.

लोणी गावातील रामराव राऊत यांची सात एकर शेती. पूर्वीपासून ते शेती करायचे. मात्र तेवढी ती नफ्याची होत नाही, असे वाटून किराणा दुकान सुरू केले. मात्र फायदेशीर शेतीसाठी त्यांनी पुन्हा मानसिकता तयार केली. किराणा व्यवसायातून निवृत्ती पत्करल्यानंतर संत्रा पीक लागवडीचा निर्णय घेतला. विहीर खोदून सर्वप्रथम पाण्याची सोय केली. गावालगतच्या तीन एकरांवर संत्रा लावला. बाग फळावर येण्यापूर्वी सोयाबीनचे आंतरपीक घेतले. गाव शिवारातच अन्य चार एकर कोरडवाहू शेतीत ते सोयाबीन व तूर घेतात.

संत्रा बाग लागवड सन 2002 मध्ये पावसाळी हंगामात 18 x 18 फूट अंतरावर 375 झाडांची लागवड केली. अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजनाघाट येथून नागपुरी वाणाची कलमे आणली. दोन वर्षे "गॅप फिलिंग' (खाडे भरणे) यापैकी 350 झाडे सध्या जिवंत आहेत. पाण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था आहे. 40 हजार रुपये खर्चून शेताला तारेचे कुंपण केले आहे. फळधारणा झाल्यावर झाडाला आधार देण्यासाठी 60 हजार रुपये खर्चून बांबूंची सोय केली आहे. ठिबक आणि कलमांसाठी शासकीय अनुदानाची थोडी मदत मिळाली आहे.

तंत्रज्ञान वापर वैशिष्ट्ये - -सेंद्रिय पद्धतीच्या खत व्यवस्थापन व बागेच्या स्वच्छतेवर भर.
एकरी पाच ट्रॉली शेणखताचा वापर. सर्व शेणखत विकत घेतले जाते. उन्हाळ्यात बागेची नांगरणी करण्यापूर्वी शेणखत पसरवून दिले जाते. रासायनिक खतांचा वापर पूर्ण बंद केला आहे.

झाडाचे पोषण करण्याकडे विशेष लक्ष -मृग बहर का?
* फळगळ कमी होते, त्यामुळे उत्पादनात वाढ होते.
* मे महिन्यात पाण्याचा ताण द्यावा लागतो. त्यामुळे कमी पाण्यात व्यवस्थापन करता येते
* फळाचा दर्जा चांगला, त्यामुळे दर चांगले मिळतात.

पीक संरक्षण - सायट्रस सायला, फायटोप्थोरा, खोडकीड व डिंक्‍या आदी किडी-रोगांचा प्रादुर्भाव जाणवतो. वेळच्यावेळी कीडनाशकांची फवारणी करून नियंत्रण. किडींच्या (स्थानिक भाषेत डास) नियंत्रणासाठी लिंबाच्या पानाचा धूर, प्रकाश सापळ्यांचा वापर. झाडाचे आरोग्य राखण्यासाठी द्रवरूप खतांचा व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर. बोर्डो पेस्टचा वापर होतो. दरवर्षी जून महिन्यापासून फवारण्यांना सुरवात होते. फवारणी झाडाच्या बुडापासून शेंड्यापर्यंत होते. फवारणीत खोड पूर्ण ओले होईल याची दक्षता घेतली जाते. बाग तणांपासून स्वच्छ ठेवण्यासाठी तणनाशकाचाही वापर.

पाणी - प्रति झाड दोन ड्रीपर आणि काही मायक्रोट्युबने 80 ते 120 लिटर पाणी दररोज दिले जाते. पाण्याचे वेळापत्रक भारनियमनाच्या वेळा पाहून ठरविले जाते. सकाळी पाणी दिल्याने फळगळ कमी होत असल्याचे राऊत यांचे निरीक्षण आहे. कोणता बहर राखायचा यावरही पाणी व्यवस्थापन अवलंबून असते. मृग बहरासाठी बागेला सप्टेंबरपासून एप्रिल महिना पूर्ण होईपर्यंत पाणी दिले जाते. मेमध्ये ताण दिला जातो. आंबिया बहरात डिसेंबरमध्ये ताण दिला जातो. कृषी विभागातील सदानंद मनवर यांचे सहकार्य त्यांना मिळते.

राऊत यांच्याकडून शिकण्यासारखे काही - * शेतीत कुटुंबाचे सहकार्य घेतात
* चर्चा, वाचनातून माहिती मिळवितात
* कारणमीमांसेवर भर देऊन प्रत्येक गोष्टीचे विश्‍लेषण करतात
* निवृत्तीच्या वयातही जिद्दीने शेतीत कष्ट घेतात

मार्केट व पिकाचा ताळेबंद एकरी सुमारे 125 झाडे आहेत. मात्र प्रत्येक वर्षी उत्पादन देणाऱ्या झाडांची संख्या कमी-जास्त असते.
प्रति झाड सुमारे 800 ते 1200 फळे लागतात. मागील वर्षी एकरी 60 झाडांनीच उत्पादन दिले.
तरी अलीकडील वर्षांची सरासरी सांगायची तर एकरी सहा ते आठ टनांपर्यंत उत्पादन मिळते.
सन 2012 मध्ये तीन एकराची बाग 4,90,000 व 2011 मध्ये 3,60,000 रुपयांना बागवानाला विकली.
प्रत्येक वर्षी बागेचा सौदा वेगवेगळा होतो. त्यामुळे स्थिर दर मिळत नाही. बागेचे दर फलोत्पादनावर ठरतात. परिसरात बागा कमी असल्यास दर जास्त तर उत्पादन चांगले मिळाल्यास सरासरी दर मिळतात. आंबिया बहरापेक्षा मृग बहराला दर अधिक मिळतात. नांदेड, वाशीम, मानोरा, अकोला व अमरावतीचे व्यापारी संत्रा खरेदीसाठी येतात. बाग तोडून नेण्याचा खर्च व्यापाऱ्याचा असतो. बागेची विक्री बहर येताच किंवा संत्रा काढणीला येण्यापूर्वी सुमारे एक महिन्यापूर्वी होते. यासाठी मध्यस्थामार्फत व्यापारी बाग पाहतात. त्यानंतर बागेचा सौदा ठरतो. सौद्यावेळी दोन टक्के मध्यस्थी द्यावी लागतात. सौद्याची सर्व रक्कम हाती आल्याशिवाय बाग तोडू दिली जात नाही.
सन 2011 मध्ये खर्च वजा जाता एकरी 92 हजार, तर 2012 एकरी 1,32 हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. यंदा बागेची स्थिती पाहता त्या दरम्यान नफा अपेक्षित आहे.

तुलनात्मकता - अन्य पिकांच्या तुलनेत संत्रा फायदेशीर असल्याचे राऊत म्हणतात. नगदी मिळणारा पैसा, पीक येण्यापूर्वीच किमान एक तृतीयांश रक्कम हाती येते. खर्च कमी करून कमी मेहनतीत संत्रा फुलविता येतो. कपाशी व सोयाबीनमधून कसाबसा उत्पादन खर्च निघायचा. मात्र संत्र्यापासून आर्थिक आवक बऱ्यापैकी वाढली असून एकदा केलेल्या गुंतवणुकीतून अजून 15 वर्षे तरी उत्पन्न मिळत राहील.

समस्या व उपाय - -भारनियमन, पाण्याची अपुरी उपलब्धता.
-संत्रा प्रक्रिया उद्योग परिसरात नसल्याने विक्रीसाठी पूर्णतः व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. व्यापारी व मध्यस्थांचे सख्य असल्याने शेतकऱ्यांना बागेचा सौदा व्यापारी म्हणतील त्या दरानेच करावा लागतो. मध्यस्थांच्या संपर्कात राहून व्यापाऱ्यांना बाग दाखविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
-सौदा झाल्यावरही अनेक वेळा गारपीट व अन्य कारणांमुळे फळगळ झाल्यास व्यापारी शेतकऱ्यांबरोबरचा सौदा सोडून देतात. अशावेळी तोटा सहन करावा लागतो.

राऊत यांनी दिला सल्ला... -बागेची विक्री बऱ्यापैकी फळधारणा झाल्यावरच करावी. बहर धरल्यावर नको.
*संत्रा बाजारात व्यापारी व मध्यस्थांची एकजूट असल्याने शेतकऱ्याचा स्वतः फळविक्रीचा प्रयत्न हाणून पाडण्याचे प्रयत्न होतात. सौद्यावेळी बाग विक्री रकमेची अर्धी रक्कम देण्याचा व्यापाऱ्याला आग्रह धरावा.
सौद्याची पूर्ण रक्कम हाती आल्याशिवाय बागेची तोडणी नको.

शेजारीपणाचा असाही आदर्श राऊत यांच्या शेताला लागूनच अनिल मोखाडे यांचे शेत आहे. दोघे शेजारी गुण्यागोविंदाने राहतात. दोघांच्या शेताला नाममात्र धुरा असून एकाच प्रवेशद्वारातून शेतात प्रवेश होतो. राऊत यांच्या विहिरीवरून मोखाडेंच्या शेताला पाणी दिले जाते. तर मोखाडेंचे बैल राऊत यांच्या शेतात काम करतात. दोघांनी काही दिवस एकत्रित रेशीम शेती केली आहे. दोघांच्या शेताला एकच तार कंपाउंड असून त्याचा खर्च त्यांनी अर्धा अर्धा वाटून घेतला. असा शेजारधर्म असलेले उदाहरण विरळेच म्हणायला हवे!

संपर्क - रामराव राऊत, 8975955295
लोणी, ता. आर्णी, जि. यवतमाळ

No comments:

Post a Comment