Wednesday, 18 September 2013

मुख्याध्यापक झाले प्रयोगशील शेतकरी

लालासाहेब निवृत्ती पाटील यांची ओळख सांगायची तर 32 वर्षे त्यांनी मुंबई येथील साने गुरुजी विद्यालय (दादर) येथे शिक्षकी व्यवसाय केला. ते शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्यांचे शिक्षण बी.एस्सी. बी.एड.पर्यंत झाले आहे. व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत असले तरी त्यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी ही शेतीचीच आहे. सांगली जिल्ह्यातील नेर्ले (ता. वाळवा) हे त्यांचे गाव. त्यांचे मोठे बंधू विलासराव हे गावच्या शेतीची जबाबदारी पाहात. मात्र, मध्यंतरी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्याचा मानसिक धक्का लालासाहेब यांना बसला. डॉक्‍टरांनी त्यांना काही दिवस नेर्ले येथील घरी विश्रांती घेण्यास सांगितले, त्याप्रमाणे लालासाहेब आपल्या गावी आले. मात्र, केवळ घरी बसून राहणे त्यांना मानवेना. घरच्या शेतीची थोडी- थोडी सद्यःस्थिती त्यांनी जाणून घेण्यास सुरवात केली. एकूण 20 एकरांपर्यंत संयुक्त कुटुंबाची शेती होती, त्यात नऊ ते दहा एकर ऊस होता.

उसाचे अर्थशास्त्र जाणून घेताना उत्पन्नवाढीच्या दृष्टीने व शेतीचा विकास करण्याच्या दृष्टीने अजून काय करता येईल याचा अभ्यास त्यांनी सुरू केला.
दरम्यान, जवळच्याच जक्राईवाडी (ता. वाळवा) येथील प्रगतिशील शेतकरी प्रकाश गायकवाड यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांनी काकडी पिकातून यापूर्वी चांगले यश मिळवले होते. त्यांनी हेच पीक करण्यासाठी लालासाहेब यांना सुचविले. पुढे जाऊन ढोबळी मिरची घेण्याचाही सल्ला दिला. एवढेच नव्हे तर या पिकाचे लागवड तंत्रज्ञान, त्यातील पॉलिमल्चिंग, ठिबक सिंचन आदींविषयी प्रत्यक्ष शेतात येऊन मार्गदर्शन केले.

लालासाहेब यांचा आत्मविश्‍वास त्यामुळे वाढला, त्यांना शेतीत नवा हुरूप आला. पूर्वी शेतातील अनेक कामे करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीस होताच. आता फक्त सुधारित शेती चांगल्या प्रकारे आत्मसात करायची होती. पाण्याची सोय करण्याच्या दृष्टीने कृष्णा नदीवरून साडेसात किलोमीटरवरून पाइपलाइन केली. भांडवल गुंतवणुकीसाठी बॅंकेकडून कर्ज काढले. परिसरातील रोपवाटिकेतून रोपे आणून सुधारित पीक पद्धतीच्या शेतीला सुरवात केली.
सर्वप्रथम काकडीचे पीक सुमारे 38 गुंठ्यांत घेतले. ही लागवड यंदाच्या मे महिन्यात केली होती.

या पिकातून सुमारे 30 टन उत्पादन मिळाले. सुमारे अडीच लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले, त्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत खर्च आला.
मुंबई मार्केटला प्रति किलो 14 ते 16 रुपये, काही वेळा 12 रुपये, तर नंतरच्या टप्प्यात तो अगदी सात रुपयांपर्यंत खाली घसरला.

ढोबळी मिरचीचे व्यवस्थापन - 23 मेच्या सुमारास ढोबळी मिरचीची लागवड सुमारे 38 गुंठ्यांत केली. सुमारे नऊ हजार रोपे बसवली. मात्र, पुढे सुमारे आठ हजार रोपे उत्पादनक्षम राहिली. प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले.

पीक नियोजन - पूर्वी या ठिकाणी उसाचे क्षेत्र होते. मिरचीची लागवड करण्यापूर्वी त्यात शेणखत व कारखाना मळी टाकली. त्यानंतर ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने नांगरट केली. सऱ्या सोडून दिल्या. रोटरच्या साहाय्याने संपूर्ण रान एकजीव केले. ठिबक व पॉलिमल्चिंगची जोड दिली. ठिबकद्वारे खतांच्या मात्रा दिल्या. साडेचार फूट उंचीवर तारकाठीचे व्यवस्थापन केले.

एकूण नियोजनातून आतापर्यंत 19 टन मालाचे उत्पादन व विक्री झाली आहे. एकूण झालेल्या तोड्यांमधून सुमारे साडेसहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. अजून सुमारे आठ ते दहा तोडे होणे अपेक्षित आहे. प्रति तोडा तीन टनांपर्यंत उत्पादन सुरू आहे. ढोबळी मिरचीचे प्रति नग वजन सुमारे 250 ते 300 ग्रॅमपर्यंत आहे.

मार्केटचा अनुभवही लालासाहेब यांना नवा होता. त्यांनी गायकवाड यांच्या सल्ल्याने पुणे व मुंबई बाजारपेठेत मिरचीची विक्री केली. त्यातही मिरचीची गुणवत्ता व आकार चांगला असल्याने मुंबईतील हॉटेलना चांगली मागणी येईल, त्यादृष्टीने त्या बाजारपेठेत विक्री करावी असा सल्ला त्यांना मिळाल्यानंतर
त्यांनी तेथेच विक्रीवर भर दिला. मिरचीला प्रति किलो 30 रुपये सरासरी दर मिळाला. काही वेळा कमाल 65 रुपये, काही वेळा 40 ते 50 रुपये, तर काही वेळा 20 ते 24 रुपये असा विविध दर मिळाला.

टोमॅटो - दीड एकरावरील या पिकाची काढणी होण्यास अजून कालावधी आहे.

झेंडू - सुमारे 30 गुंठे क्षेत्र आहे. आतापर्यंत चार तोडे झाले आहेत. मुंबई मार्केटला झेंडू पाठवला जात आहे, त्याला प्रति किलो 50 ते 60 रुपये दर मिळाला आहे.

शेतीविषयी ठेवला सामाजिक दृष्टिकोन लालासाहेब यांच्यावर साने गुरुजी यांच्या तत्त्वज्ञानाचे संस्कार झाले आहेत. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला अभियानाचे ते सुमारे आठ वर्षांपासून कार्याध्यक्ष आहेत. या अभियानाच्या सुमारे 450 शाखा आहेत.
त्या माध्यमातून लहान मुलांवर चांगले संस्कार घडवण्यासाठी संस्कार परीक्षांचे आयोजन त्यांच्यामार्फत केले जाते. लालासाहेब म्हणतात, की शेतीतही असेच काम मला सेवानिवृत्तीनंतरच्या सध्याच्या काळात करायचे आहे.
नवी पीक पद्धती तसेच शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांच्यासाठी जी काही सेवा करता येईल ते पाहणार आहे.
शेतकऱ्यांची नवी पिढी अधिक संस्कारक्षम व्हावी, शेती अधिक आर्थिक सक्षम व्हावी यासाठी येत्या काळात प्रयत्न करणार आहे.

ढोबळी मिरचीसारखे पीक चांगल्या प्रकारे पिकवले तर उसाच्या पारंपरिक पिकांच्या तुलनेत ते चांगले आर्थिक उत्पन्न देऊ शकते हे मला पटू लागले आहे. जमिनीचा पोत चांगला आहे. परिसरात पिकांसाठी निरोगी वातावरण आहे. अर्थात, नजीकच्या काळात अजून काही चांगले प्रयोगही करायचे आहेत. ज्या वेळी ढोबळी मिरचीचे पीक घेण्याचा विचार केला, त्या वेळी घरून विरोध झाला होता. खर्चिक पीक असल्यामुळे ते पुढे बहरले नाही तर खर्च पाण्यात जाऊ शकतो, असा कुटुंबाचा सूर होता; परंतु परिसरातील अनुभवी शेतकऱ्यांच्या पाठबळावर हे पीक घेण्याचे धाडस केले. सध्या मुंबई ते नेर्ले असे सतत जाऊन- येऊन करावे लागते; मात्र शेतीत स्वतःला झोकून दिले असल्याने कष्टाचे काही वाटत नसल्याचे लालासाहेबांनी सांगितले.

संपर्क - लालासाहेब पाटील - 7745093209

No comments:

Post a Comment