Wednesday, 2 October 2013

इंजिनिअर अमित यांनी पालटविले पारंपरिक शेतीचे रूप

लातूर जिल्ह्यात चिखुर्डा येथील अमित काळे यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण लातूरमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यात बी.ई.चे (इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍण्ड कम्युनिकेशन) शिक्षण घेतले. मुंबईत चांगली नोकरी मिळाली. तीन वर्षे तेथे अनुभव घेतला. पण नोकरीत मन रमत नव्हते. लातूरला येऊन कोणते तरी "प्रॉडक्‍शन युनिट' सुरू करावे असे वाटू लागले. मनाशी निश्‍चय पक्का घेऊन नोकरी सोडून तीन वर्षांपूर्वी लातूर गाठले. मात्र युनिट सुरू करण्यात समस्या अधिक आहेत हे लक्षात आले. त्यानंतर गावी येऊन शेतीतच प्रगती करावे, असे त्यांना वाटू लागले. अमित यांची वडिलोपार्जित शेती. वडील अशोकराव व दोन काका पारंपरिक शेती करायचे. ऊस शेतीवर अधिक भर होता. अमित यांचा शेतीचा संबंध अगदी कमी होता. मात्र "इंजिनिअर' मुलगा शेतात काही वेगळे करायचे, पॉलिहाऊस शेती करायची असो सांगतो तेव्हा घरच्यांनी थोडा विरोध केला. पण अमित आपल्या मतावर ठाम होते. अखेर घरच्यांनी संधी दिली अन्‌ अमित यांचा प्रवास सुरू झाला.

प्रशिक्षण, अभ्यासानंतर शेती पॉलिहाऊस करायचे ठरल्यानंतर तळेगाव (पुणे) येथील हॉर्टिकल्चर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून अमित यांनी फुलशेतीचे प्रशिक्षण घेतले. लागवड तंत्रज्ञान, खते व पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण, मार्केटिंग आदी सर्व माहिती त्यांनी येथून घेतली. त्यानंतरही शेतीतील अभ्यास सुरूच ठेवला. आता याच ज्ञानाचा शेती करताना फायदा होत आहे.

पॉलिहाऊसमधील अनुभव बॅंकेकडून कर्ज घेत 2010 मध्ये वीस गुंठ्यांत पॉलिहाऊस उभे केले. त्यात जरबेरा घेतला.
त्याला येत्या नोव्हेंबरमध्ये तीन वर्षे पूर्ण होतील. या शेतीतील अनुभव लक्षात घेऊन मागील वर्षी त्यात वीस गुंठ्यांची वाढ केली. आता यंदाच्या वर्षी हे क्षेत्र आणखी वाढवले आहे. जरबेराच्या येथे आठ विविध प्रकारच्या "व्हरायटी' पाहण्यास मिळतात. हैदराबाद, औरंगाबाद व स्थानिक बाजारपेठेत उत्पादनांचे मार्केटिंग व विक्री केली.

अर्थशास्त्र - (20 गुंठ्यांचे) पॉलिहाऊस उभारणी, बेड, फ्युमिगेशन व सुरवातीला एकूण 21 लाख रुपये खर्च आला. सुमारे 12 हजार रोपे बसतात. प्रति रोप वर्षाला 50 फुले येतात. वर्षाला एकूण सहा लाखांपर्यंत फुले मिळतात. प्रति फूल दोन ते अडीच रुपये व काही वेळा तो दर एक रुपयांपेक्षाही खाली मिळतो. लागवडीपासून ते वाहतुकीपर्यंत खर्च वजा जाता सहा लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो.

उसाचे क्षेत्र कमी करून घेतले नगदी पीक वडील, चुलते वर्षानुवर्षे ऊसच घेत. एकदा ऊस लावला की फारसे त्याकडे लक्ष दिले जात नसे. सुमारे 25 एकर ऊस होता. यात पैसा, पाणी, पिकाच्या वाढीसाठी लागणारा वेळ यांचा अमित यांनी अभ्यास केला. यातून त्यांनी उसाचे क्षेत्र कमी करीत ते केवळ पाच एकरपर्यंत नेऊन ठेवले आहे. उसाचे एकरी उत्पादन 40 ते 50 टन आहे. गेल्या दोन वर्षांत पाणीटंचाई व ऊसदर या समस्या उभ्या ठाकल्या आहेत.

खरबूज व कलिंगड यशस्वी पहिल्या पॉलिहाऊसच्या उभारणीनंतर दुसरे सुरू करण्याआधी थोडा कालावधी होता. त्या काळात ऊस तुटून गेल्यानंतरच्या काळात मार्चमध्ये अडीच ते तीन एकरांत खरबूज पीक घेण्याचे ठरले. यासाठी पॉलिमल्चिंग, ठिबक सिंचनाचा वापर केला. एकूण क्षेत्रातून सुमारे 35 टन उत्पादन मिळाले. त्याला किलोला 20 रुपये, 25 रुपये व कमाल 38 रुपये दर मिळाला. गुणवत्ता अत्यंत चांगली असल्यानेच हा कमाल दर मिळाला. या प्रयोगानंतर आत्मविश्‍वास वाढला. त्यानंतर रमझान सणाचे उद्दिष्ट ठेवून त्याच शेतात जूनच्या दरम्यान कलिंगड तेवढ्याच क्षेत्रात घेतले. या वेळी एकरी उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी म्हणजे सुमारे 12 टनांपर्यंत मिळाले. दर किलोला 9 ते 11 रुपयापर्यंत मिळाला.

आता उभारणी झालेले एक एकर पॉलिहाऊस, त्यात नव्याची भर, ऊस, सोयाबीन, हरभरा व हंगामानुसार खरबूज, कलिंगड यांची लागवड अशी पीक पद्धती हंगामनिहाय ठेवली आहे.

पाण्याच्या नियोजनावर अधिक भर अमित यांच्या शेतातून सिमेंट नाला बंधारा जातो. या भागात कमी पाऊस असल्याने पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे या वर्षी या सिमेंट नाल्यातील गाळ काढून त्याची खोली वाढवली. त्यामुळे नाल्यात पाणी वाढले. या नाल्याजवळच 44 बाय 44 बाय साडे पाच मीटरचे शेततळे घेतले. सुमारे एक कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी साठते. त्यातून संरक्षित पाणी मिळवले आहे.

गांडूळ खताच्या वापरावर भर शेतात शंभर बाय तीस फुटांच्या शेडमध्ये गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प आहे. त्याचा वापर पिकांसाठी केला जातो. जरबेरा फुलांसाठी व्हर्मिवॉशचा वापर केला जातो. रासायनिक खतांचा वापर कमी केला आहे.

अमित काळे यांनी जोपासले हे गुण -पिकाचा शास्त्रीय अभ्यास करतात. पिकावर कोणते रोग-किडी येतात, त्यांची ओळख यांचा बारकाईने अभ्यास.
-सर्व पिकांचे अर्थशास्त्र, विक्री ताळेबंद यांची नोंद व्यवस्थित ठेवतात.
-पारंपरिक पिकांसोबत नगदी व हायटेक फुलशेतीही. एकात्मिक पद्धतीमुळे शेतीतील जोखीम कमी केली.
-सतत अभ्यासूवृत्ती व नवे प्रयोग करण्याची वृत्ती

नोकरीपेक्षा शेतात काम करण्याचे समाधान वेगळे आहे. वेगवेगळे प्रयोग करण्याची संधीही मिळते. आयटी इंजिनिअर असल्याने चांगल्या कंपन्यांच्या चांगल्या पगाराच्या ऑफर्स आल्या, पण त्यात रमलो असतो तर शहरापुरते केंद्रित झालो असतो. शेतीत सामाजिक जाणीव निर्माण होते. त्याचा आनंद आहे. शेतीसाठी कन्सल्टंट नियुक्त करावा, असे अनेकवेळा सांगितले जाते. मला वाटते ते चुकीचे आहे. स्वतःच शेतीचा अभ्यास करून ज्ञानवृद्धी केली तर शेती नक्कीच फायद्याची आहे.

संपर्क - अमित काळे, 9890927216, 7588611477
चिखुर्डा, ता. लातूर

No comments:

Post a Comment