Tuesday, 15 October 2013

रब्बी ज्वारी लागवडीचे नियोजन

1) रब्बी ज्वारी पेरणीसाठी सुधारित व शिफारस केलेल्या जातींची निवड करावी. हलक्‍या जमिनीसाठी सिलेक्‍शन-3, फुले अनुराधा, तसेच मध्यम जमिनीसाठी फुले माऊली, फुले सुचित्रा, मालदांडी 35-1, भारी जमिनीसाठी- फुले वसुधा, फुले यशोदा, सी एच व्ही. 22, पीकेव्ही क्रांती, परभणी मोती या जाती निवडाव्यात. हुरड्यासाठी फुले उत्तरा व लाह्यांसाठी फुले पंचमी या जातींची निवड करावी. भारी जमीन बागायतीसाठी फुले रेवती जातीची निवड करावी.
2) रब्बी ज्वारी पेरणीपूर्वी मूलस्थानी जलसंधारण करावे. त्यासाठी उतारानुसार 10x12 चौ.मी. आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. किंवा 2.70 मीटर अंतरावर उताराला आडवे सारा यंत्राने सारे पाडून दर 20 मीटरवर बळिराम नांगराच्या साहाय्याने दंड टाकावेत.
3) पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण करावी.
4) प्रतिहेक्‍टरी 10 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास चार ग्रॅम गंधक (300 मेश) बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर व 250 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी.
5) पेरणीसाठी 45 x 15 सें.मी. अंतर ठेवावी.
6) बागायती पिकासाठी भारी जमिनीस एकूण 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावे. त्यापैकी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश पेरणीच्यावेळी पेरून द्यावे. उरलेले 50 किलो नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे. मध्यम जमिनीस 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश द्यावा. त्यापैकी अर्धा नत्र संपूर्ण स्फुरद व पालाश पेरताना द्यावा व उर्वरित 50 टक्के नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावा.
7) कोरडवाहू हलक्‍या जमिनीतील पिकासाठी हेक्‍टरी 25 किलो नत्र पेरणीच्यावेळी पेरून द्यावे.
8) ज्वारी पीक पेरणीसाठी दोन चाडी पाभरीचा वापर करावा.

रब्बी ज्वारीच्या संकरित व सुधारित जाती - करडई लागवड -
1) पेरणीसाठी सुधारित जातींची निवड करावी. फुले एसएसएफ 733 ही जात 120-125 दिवसांत तयार होते. याचे उत्पादन प्रति हेक्‍टरी 13 ते 29 क्विंटल इतके मिळते. ही जात मावा किडीस प्रतिकारक्षम असून, जिराईत क्षेत्रास चांगली आहे. एसएसएफ 658, बिन काटेरी जात आहे. या जातीचे प्रति हेक्‍टरी उत्पादन 14 ते 15 क्विंटल आहे. जिरायती क्षेत्रावर या जातीची लागवड करावी. भीमा ही जात 130 ते 135 दिवसांत तयार होते. प्रति हेक्‍टरी या जातीचे 14 ते 16 क्विंटल उत्पादन मिळते. डी.एस.एच.129 ही जात 125 ते 130 दिवसांत तयार होते. या जातीचे प्रतिहेक्‍टरी 18 ते 20 क्विंटल इतके मिळते.
एस.एस.एफ. 708 ही जात 115 ते 120 दिवसांत तयार होते. या जातीचे जिरायतीमध्ये प्रति हेक्‍टरी 13 ते 15 क्विंटल आणि बागायतमध्ये 20 ते 22 क्विंटल उत्पादन मिळते.
2) पुणे जिल्ह्यातील जिरायती व ओलिताच्या क्षेत्रासाठी फुले कुसुमा (जेएलएसएफ- 414) या जातीची लागवड करावी. ही जात 135 ते 140 दिवसांत तयार होते. या जातीचे हेक्‍टरी जिरायती भागात 12 ते 15 क्विंटल व बागायती परिस्थितीत 15 ते 17 क्विंटल उत्पादन मिळते.
3) करडईचे सलग पीक घ्यावे. लागवडीसाठी हेक्‍टरी 10 ते 12 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास दोन ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर आणि 250 ग्रॅम पीएसबी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
4) पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. पेरणी उशिरात उशीर 10 ऑक्‍टोबरपूर्वी पूर्ण करावी.
5) पेरणी 45 सें.मी. अंतराच्या पाभरीने करावी. बियाणे पाच ते सहा सें.मी. खोलीवर पडेल अशी काळजी घ्यावी.
6) पेरणीच्यावेळी जिरायती पिकासाठी हेक्‍टरी 50 किलो नत्र व 25 किलो स्फुरद द्यावे. शक्‍यतो दोन चाड्याच्या पाभरीने खते व बियाणे एकाच वेळेस पेरावे. बागायती पिकासाठी हेक्‍टरी 60 किलो नत्र व 30 किलो स्फुरद द्यावे. यापैकी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरदाची मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी. राहिलेले निम्म्या नत्राची मात्रा 30 दिवसांनी पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावी.
7) पेरणीनंतर 15 दिवसांनी विरळणी करावी. दोन झाडांतील अंतर 15 ते 20 सें.मी. ठेवावे.

No comments:

Post a Comment