Wednesday, 2 October 2013

सैन्यात असो वा शेतात लढणे सोडले नाही

वर्णे (ता. सातारा) हे गाव सातारा शहरापासून पूर्वेला 14 किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील धोंडिराम पवार यांच्याकडे 20 एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यांची दोन्ही मुले योगेश व संतोष हे दोघे सैन्यदलामध्ये कार्यरत होते. या बंधूंपैकी योगेशच्या डाव्या मांडीमध्ये 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धामध्ये गोळी लागली. देशसेवा करताना त्यांला अपंगत्व आले. योगेश 2000 मध्ये सैन्यातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर योगेशने दोन वर्षे खासगी नोकरी केली. मात्र शेतीच्या कामांची आबाळ होत असल्याने नोकरीत मन रमत नव्हते. अपंगत्वामुळे शेतीतील कामे कितपत जमतील, या विषयी आत्मविश्‍वास नव्हता. त्यामुळे निर्णय होत नव्हता. मात्र घरातील लोकांनी आत्मविश्‍वास दिल्याने शेतीकडे लक्ष देण्यासाठी नोकरी सोडली.

...अशी होती परिस्थिती - वडिलोपार्जित शेती 20 एकर असली तरी बागायतीचे प्रमाण कमी होते. शेतीसाठी पाण्याची सोय म्हणून नवी विहीर खोदली. त्यावरून शेतापर्यंत सुमारे सहा हजार फूट पाइपलाइन केली. या पाण्याने दहा एकर बागायत केले.
- शेतीची सुरवात ऊस, सोयाबीन, ज्वारी यांसारखी पारंपरिक पिके घेत केली. गावात अनेक शेतकऱ्यांकडे हरितगृह आहेत. त्यांच्या प्रमाणेच आपलेही हरितगृह असावे, अशी इच्छा मनात होती. मात्र मोठा भाऊ संतोष सैन्यात कार्यरत व आपल्या पायास अपंगत्व आलेले. हरितगृहातील कामे कितपत जमतील या विषयी शंका होती. त्यामुळे योगेश यांनी अन्य शेतकऱ्यांच्या हरितगृहामध्ये जाऊन फवारणी, फुले तोडणी यांसारखी कामे करता येतील का याचा अंदाज घेतला. ही कामे जमू शकतील, असे वाटल्यावर दहा गुंठे क्षेत्रावर ग्रीन हाऊस उभारण्याचा निर्णय घेतला.
- सध्या योगेश पवार यांच्याकडे 10 एकर बागायत क्षेत्रापैकी सात एकर ऊस, तीन एकर आले, 10 गुंठे हरितगृहात जरबेरा ही पिके आहेत.

हरितगृहाचे नियोजन - 2009 मध्ये योगेश पवार यांनी हरितगृह उभारणीचे नियोजन केले.
- त्यांनी सुरवातीस दहा गुंठे क्षेत्रामध्ये 20 ट्रेलर शेणखत, दोन टन भाताचा भुस्सा, एक ट्रेलर वाळू व लाल माती 110 ब्रास या प्रमाणे मिश्रण करून घेतले.
- त्यानंतर लाल माती भिजवून जमिनीला वाफसा आल्यानंतर रासायनिक खताचा बेसल डोस दिला.
- गादी वाफे दोन फूट आकाराचे करून मध्ये चालण्यासाठी एक फूट आकाराचा रस्ता सोडला. या बेडवर जूनमध्ये जरबेरा रोपांच्या दोन ओळी 45 सेंटिमीटर अंतरावर ठेवून दोन रोपांमध्ये एक फूट इतके अंतर ठेवले. लागवडीसाठी सहा हजार 200 जरबेरा रोपे लागली. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस फुले सुरू झाली.

व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी - दहा एकर शेतीमध्ये ठिबकचा वापर करतात.
- हवामानाच्या बदलावर लक्ष ठेवून फवारणीचे नियोजन केले जाते.
- शेतीतील सर्व प्रकारच्या नोंदी ठेवल्या जातात.
- मुख्य पिकास पोषक आंतरपिके घेतली जातात.
- प्रत्येक वर्षी उसातील पाचट न जाळता आच्छादन करतात.
- हरितगृहातील सर्व कामे वेळेवर करण्यावर भर दिला जातो.

वैशिष्ट्ये - ऊस शेतीतील एकरी 70 टनापर्यंत उत्पादन.
- आल्याचे एकरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन घेतात.
- स्वतः योगेश अपंग असूनही हरितगृहामध्ये सर्व कामे करतात. त्यांना घरातील सदस्यांची साथ मिळते. त्यासाठी मजूर लावत नाही. फुलांची काढणी व पॅकिंग आई, पत्नी दीपाली, भावजय मनीषा, बहीण कोमल या करतात.

हरितगृह शेतीचा ताळेबंद - लाल माती 110 ब्रास व वाळू एक ब्रास - एक लाख 13 हजार रुपये, भाताचा तूस ः पाच हजार रुपये
- हरितगृह उभारणीसाठी - पाच लाख 40 हजार रुपये
- रासायनिक खत व शेणखत - 80 हजार
- बेड बनविण्यासाठी 15 हजार रुपये
- ठिबक सिंचन यंत्रणा - 80 हजार
- 10 गुंठे हरितगृहामध्ये 6200 रोपे (प्रति रोप 27 रुपये प्रमाणे) - एक लाख 67 हजार 400 रुपये
- पाण्याची टाकी, फवारणीसाठी स्प्रे पंप व खते देण्यासाठी व्हेंचुरी - 90 हजार
- रासायनिक खते व कीडनाशके यांचा खर्च प्रति वर्ष साधारणतः - एक लाख 60 हजार रुपये
- तसेच पॅकिंग, वाहतूक व अन्य खर्च - 90 हजार रुपये
- एकूण 12 लाख 50 हजार 400 रुपये खर्च आला आहे.
- या खर्चासाठी बॅंकेतून आठ लाख 90 हजार रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते.
- पहिल्या वर्षी तीन लाख फुले मिळाली असून, अडीच रुपये सरासरीप्रमाणे सात लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. बाजारातील दरामध्ये चढ-उतार असतात. आजपर्यंत प्रति फूल किमान एक रुपया ते कमाल सात रुपयापर्यंत दर मिळाला आहे.
- दुसऱ्या वर्षीपासून कीडनाशके व रासायनिक खताला एक लाख 60 हजार, पॅकिंग व वाहतूक 85 ते 90 हजार रुपये खर्च येतो. खर्च वजा जाता वर्षाकाठी साडेतीन ते चार लाख रुपये मिळतात.

बाजाराचा अभ्यास - वर्णे गावात शेतकऱ्यांकडे हरितगृहाची सुमारे 300 युनिट आहेत. त्यामुळे येथून दिल्ली, मुंबई, पुणे, विजयवाडा, हैदराबाद आदी ठिकाणी दररोज फुले पाठवली जातात. यामुळे फुलांचा दररोज दर कळतो.
- गावातून मोठ्या प्रमाणात फुले येत असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून इतरांपेक्षा दर चांगला मिळण्यास मदत होते.
- येथून वेगवेगळ्या शहरात फुले जात असल्यामुळे दर व मागणी यांची माहिती मिळते. तसेच या विविध व्यापाऱ्यांच्या संपर्क करूनही माहिती घेतली जाते.
- "ऍग्रोवन'मधील दर, फुलांची उपलब्धता याबाबत सातत्याने माहिती घेतली जाते. सण, समारंभ, त्यानुसार फुले काढणीचे नियोजन केले जाते.

समस्या व उपाय - हरितगृहामध्ये पिकासाठी हवामान अनुकूल असल्याने रोग व किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो. जरबेरामध्ये पावसाळ्यात पांढरी माशी व सूत्रकृमी यांचा प्रादुर्भाव झाला होता. हिवाळ्यात भुरी, करपा रोग व उन्हाळ्यात कोळी, थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव होत असल्याचा अनुभव आहे. यासाठी वेळेवर फवारणी व आळवणी केली जाते.
- गावात हरितगृह शेती अनेक वर्षांपासून होत असल्याने अनुभवी शेतकऱ्यांकडून माहिती घेऊन उपाययोजना केली जाते.
- वर्षातील काही महिन्यांमध्ये फुलांना दर कमी असतो. दर कमी असला तरी रोपांची काळजी घेतली जाते.

नियोजन आणि मार्गदर्शन - - गावातील अनुभवी शेतकऱ्यांकडून हरितगृह उभारणीपासून मार्केटच्या नियोजनापर्यंत मार्गदर्शन झाले आहे.
-रोज ऍग्रोवन वाचून त्यातील शेतकऱ्यांशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवतो. गरज वाटल्यास प्रत्यक्ष भेट देतो. ऍग्रोवनमधील आवश्‍यक लेखांची कात्रणे काढत असल्याचे योगेश यांनी सांगितले.
- बंधू संतोष याच्यासह दरवर्षीच्या पिकांचे नियोजन केले जाते. आणखी 20 गुंठे हरितगृह व 10 गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवडीचे नियोजन आहे.

योगेश पवार, 9890722665

No comments:

Post a Comment