Wednesday, 2 October 2013

बायोगॅस - तंत्र शाश्‍वत ऊर्जेचे

बायोगॅससोबत असते बाष्प आणि न जळणारा किंबहुना अग्निशामक असा लौकिक असलेला कार्बन डाय-ऑक्‍साईड वायू. या वायूचे यशस्वी विलगीकरण करणे हा मुद्दा कळीचा होताच. इथेही शाळेत शिकलेले सामान्य विज्ञानच कामी आले. सहावी- सातवीच्या विज्ञानाच्या धड्यात आपण सर्वजण हे शिकलोच आहोत, की दाबाखाली कार्बन डाय-ऑक्‍साईड वायू पाण्यात द्रावणीय आहे. याचे रोजच्या व्यवहारातील उदाहरण म्हणजे काचेच्या बाटलीतील फसफसणारा सोडा. अधिक माहिती घेता हे लक्षात येते, की थंड पाण्यामध्ये जर कार्बन डाय-ऑक्‍साईड वायू सोडला, तर तो वायुस्वरूपात न राहता पाण्यामध्ये विरघळला जातो. शास्त्रीय परिभाषेत याला कार्बोनिक ऍसिड म्हणतात. इथे हा विरोधाभास महत्त्वाचा, की पाण्याचे तापमान कमी असताना त्यात जरा कार्बन डाय-ऑक्‍साईड वायू विरघळतो. त्याउलट पाण्याचे तापमान वाढले असता, तो त्यातून सहजी वेगळा होतो. आपल्याला सोडा वॉटर प्यायला दिल्यानंतर येणारा ढेकर याचं कारण हेच असतं.

बायोगॅसमधील वायू विलगीकरणावरच्या प्रश्‍नाची उत्तरं जरी सापडली, तरी ती प्रत्यक्षात उभी करणं हे थोडंसं आव्हानात्मक होतं. या विलगीकरणासाठी जैववायू आणि पाणी यांचा संपर्क होण्यासाठी दोन गोष्टी विशेषत्वाने आवश्‍यक होत्या. एक जैववायूतील संयुक्त स्वरूपात असलेले मिथेन आणि कार्बन डाय-ऑक्‍साईड या वायूंचे रेणू वेगळे करणे, त्यासाठी वायूंचे आणि पाण्याचे रेणू एकमेकांच्या संपर्कात येण्यासाठी आवश्‍यक असलेले वायू आणि पाणी यांचे वहनाचे दर (फ्लो रेट). हा सर्व प्रयोग करत असताना मी आधीच निश्‍चित केले होते, की यासाठी कोणतेही परदेशी तंत्रज्ञान वापरायचे नाही आणि याच्या उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूही केवळ भारतीय नाहीत, तर अगदी तालुक्‍याच्या बाजारपेठेत उपलब्ध असल्या पाहिजेत. याचा हा उद्देशही अगदी योग्य होता. याचं मूळ कारण स्थानिक प्रश्‍नास स्थानिकच उत्तर असलं पाहिजे.

असे केले वायूंचे विलगीकरण - संशोधनासाठी मुळात दोन गोष्टी आवश्‍यक असतात. एक मनामध्ये आलेला विचार डोळ्यांसमोर उभा करणे आणि त्यादृष्टीने त्याची उभारणी करणे, याच विचारप्रक्रियेला एकदा सुयोग्य दिशा मिळाली, की त्यापुढील काम अगदी सोपं असतं. मला हा अनुभव वारंवार आलेला आहे आणि म्हणूनच प्रश्‍न मध्यभागी ठेवून त्याच्या अवतीभोवती मी जेव्हा पाहायला लागलो, तेव्हा लक्षात आलं, वायूला जर प्रवास करायला लावायचा असेल, तर त्याची घनता लक्षात घेतली पाहिजे. या वायूला पाण्याबरोबर अभिक्रिया करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे.
1) यासाठी सहा इंच व्यासाचा एक पी.व्ही.सी. पाइप सुमारे 20 फूट उंचीचा उपयोगात आणायचं ठरवलं. त्याची दोन्ही तोंडं एंड कॅप लावून बंद केली आणि वरच्या टोकाला अंघोळीचा शॉवर जोडला. एक एचपी पाण्याची मोटार लावून प्रवाहाचा वेग सुमारे 25-30 लिटर प्रति मिनीट ठेवला आणि आतल्या बाजूला वायूंच्या कणांचे सुटे-सुटे होणे अपेक्षित होते, यासाठी नारळाच्या शेंड्यांचा वापर केला.
2) नारळाच्या शेंड्या उघड्यावर पटकन कुजत नाहीत, तर पाइपमध्ये भरल्यावर त्यांचं आयुष्य वाढणारच. नैसर्गिकरीत्या त्यांना उत्तम सच्छिद्रता लाभलेली असल्याने या छिद्रांमधून कार्बन डाय-ऑक्‍साईड आणि मिथेन वायूचे वहन खालून वरच्या दिशेने होते.
3) इथे हेही लक्षात घेणं आवश्‍यक आहे. जैववायूमध्ये असलेल्या ह्या दोन्ही घटक वायूंची घनता निरनिराळी आहे. मिथेनची घनता 0.64, तर कार्बन डाय-ऑक्‍साईडची घनता सुमारे 1.5. याचाच अर्थ मिथेन हलका वायू असल्याने तो लवकर वर जातो आणि कार्बन डाय-ऑक्‍साईड हवेपेक्षा सुमारे दीडपट जड असल्याने हळूहळू वरती जातो आणि त्याचवेळेस वरच्या बाजूने येणाऱ्या पाण्याच्या कणांचे आणि वायू कणांचे घासणे (स्क्रबिंग) होते आणि कार्बन डाय-ऑक्‍साईड वायूचे रेणू पाण्यामध्ये विरघळले जातात आणि हे पाणी स्क्रबर पाइपच्या खालच्या टोकातून बाहेर पडते. या तंत्राला "वॉटर स्क्रबिंग' असे म्हणतात. आणि संपूर्ण जगभर हे तंत्र अवलंबले गेले आहे. सर्व शीतपेयांमध्ये विरघळलेला कार्बन डाय-ऑक्‍साईड हे आपल्या दैनंदिन जीवनातील परिचयाचे उदाहरण.
4) आता थोडासा तांत्रिक भाग तपासून पाहूयात म्हणजे या वायूंचे विलगीकरण आवश्‍यक का होतं ते समजावून घेणं सोपं जाईल. मुळात औष्णिक मूल्यांची (कॅलरीफिक व्हॅल्यू) तुलना करता स्वयंपाकासाठीचे आदर्श इंधन हे द्रवीभूत खनिज वायू (L.P.G.) यांच्याबरोबर जैववायूची सममूल्यता तपासली तर ती आहे सुमारे 2300 लिटरच्या आसपास किंवा 2.3 घनमीटर. मात्र, यामध्ये मिथेन वायू सुमारे 60 टक्के म्हणजेच सुमारे 1400 लिटर (1.4 घ.मी.).
5) आता उरलेला 900 लिटर वायू हा कार्बन डाय-ऑक्‍साईड होता. तो वेगळा केल्यावर उरलेला मिथेन हा आमच्या ढोबळमानाने सांगायचं झालं तर एक ग्रॅम एलपीजीला सममूल्य 1.4 लिटर मिथेन हा 1400 लिटर वायू सुमारे 60 कि.ग्रॅ./ सें.मी. 2 या दाबाला जर टाकीत भरायचा ठरला, तर टाकीचं आकारमान होतं सुमारे 25 लिटर क्षमतेच्या आसपास.
6) सर्वसाधारण कुटुंबात जर दररोज अर्धा कि.ग्रॅ. एलपीजी इंधन स्वयंपाकासाठी लागत असेल, तर हा 25 लिटर क्षमतेच्या टाकीत भरलेला 1400 लि. वायू आपल्या घरात सुमारे दोन दिवस पुरेल. इथेच या प्रकल्पातल्या व्यवसायाची व्यवहार्यता लक्षात येते आणि मग आम्ही संस्थेद्वारे यासाठीचा पहिला व्यावसायिक प्रकल्प उभा केला.
7) एखाद्या विषयावर मूलभूत संशोधन करताना जशा अनेक तांत्रिक, आर्थिक किंवा व्यावहारिक अडचणी येतात, त्याच अडचणी थोड्याफार फरकाने व्यवसायाच्या बाबतीतही आल्या. इथे अडचणींचा बागुलबुवा उभा करायचा हेतू नाही किंबहुना सकारात्मक दृष्टीने या अडचणींकडे पाहता, त्यावर व्यवहार्य पर्याय काढून मात करणे गरजेचे ठरते. आम्हीही नेमके हेच केले आणि उद्या एखाद्याला असाच व्यवसाय उभा करायचा असेल तर त्यासाठी नेमकी गरज कशाची? ते उभारताना येणाऱ्या अडचणी कोणत्या? आणि या सर्वांवर मात कशी करायची? हे आधी घेतलेल्या अनुभवावरून नेमके माहीत होते आणि त्यादृष्टीने व्यावसायिक प्रकल्प उभा करणे उलट जिकिरीचे न होता सोपे बनते.
8) यापूर्वीच्या इंधन पिके लेखात आपण कोणत्या गोष्टींपासून किती वायुनिर्मिती, किती वेळात आणि त्याची किंमत हेही पाहिले आहे. याचाच वापर करून मोठ्या प्रमाणावर वायुनिर्मिती करायची, वायूंचे विलगीकरण करायचे आणि तो वायू योग्य दाबाखाली टाक्‍यांमध्ये भरून त्यांच्या विक्रीचा व्यवसाय असा क्रम लावून प्लांट उभारणी केली. आम्ही या तंत्रज्ञानाचे पेटंट (स्वामित्व हक्क) हे हेतुतः घेतलेले नाही. व्यवहार्य इंधननिर्मिती करून आज आपली गरज पूर्ण करून इंधनामध्ये स्वयंपूर्णता मिळवणे गरजेचे आहे.
इथे हाही मुद्दा स्पष्ट करायला हवा, की हे तंत्र मला आजमितीला वरवर जरी सोपे वाटले असले, तरी प्रत्यक्ष उभे करताना सुमारे पाच- सहा वर्षांचा कालावधी लागला. आपली त्यातून गरज भागवणारे महत्त्वाचे सोपे दिसणारे तंत्र जरी असले, तरी प्रत्यक्ष अवलंब करून व्यवसाय करण्यासाठी आवश्‍यकता आहे सखोल ज्ञान घेण्याची आणि तंत्राचा प्रभावी वापर करण्यासाठी अनुभवाची. हे एकदा साधलं तर मग संपूर्ण देशात हा इंधनांचा व्यवसाय करणं अजिबात अवघड नाही.

No comments:

Post a Comment