Wednesday, 2 October 2013

एकाच रोपापासून मिळेल टोमॅटो- बटाटा उत्पादन!

ब्रिटिश कंपनीने विकसित केली कलमी रोपे
थॉम्पसन आणि मॉर्गन ही ब्रिटिश कंपनी लवकरच "टोमटॅटो'ची रोपे बाजारात आणणार आहे. "टोमटॅटो' हा शब्द टोमॅटो आणि पोटॅटो या दोन इंग्रजी शब्दांपासून बनविलेला आहे. या रोपांपासून एकाच वेळी टोमॅटो आणि बटाटा यांचे उत्पादन घेणे शक्‍य होणार आहे. यामुळे एकाच कुंडीमध्ये कमी जागेमध्ये दोन्ही भाज्यांचे उत्पादन घेणे आता शक्‍य होणार आहे. शहरातील बागा आणि गच्चीतील परसबागेसाठी या प्रकारची रोपे आदर्श असल्याचे मत कंपनीच्या वतीने मांडण्यात आले आहे.

शहरामध्ये कमी जागेमध्ये भाज्यांचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न अनेक जण करत असतात, त्यांच्यासाठी इंग्लंडमधील एका कंपनीने एक नवे उत्पादन बाजारात आणले आहे. त्यांनी एका कुंडीमध्ये "टोमटॅटो'चे रोप उपलब्ध करून दिले आहे. या रोपापासून एकाचवेळी टोमॅटो आणि मातीमध्ये बटाटे यांचे उत्पादन घेता येते. एका झाडापासून सुमारे 500 चेरी टोमॅटो पूर्ण कालावधीमध्ये मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्याबाबत माहिती देताना थॉम्पसन आणि मॉर्गन या कंपनीचे व्यवस्थापक मायकेल पेरी यांनी सांगितले, की हे झाड शंभर टक्के नैसर्गिक असून, कोणत्याही प्रकारे जनुकीय बदल करण्यात आलेले नाहीत. बटाट्याच्या रोपावर टोमॅटोचे कलम हाताच्या साह्याने करण्यात आले आहे. ही कलमाची प्रक्रिया अत्यंत नाजूक असून, त्यासाठी कौशल्याची आवश्‍यकता असते. कमी जागेमध्ये अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हा टोमॅटो अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पुढील हंगामापासून "टोमटॅटो'च्या रोपांची विक्री कंपनी सुरू करणार असून, त्याची किंमत 15 ब्रिटिश पौंड (सुमारे 1500 रुपये) इतकी ठेवण्यात आली आहे.

अशी बनविली जातात "टोमटॅटो' रोपे - टोमॅटो आणि बटाटा ही पिके एकाच सोलॅन्सिस या कुळातील आहेत, त्यामुळे त्यांचे कलम करणे शक्‍य आहे.
- दोन्ही रोपांपासून अत्यंत लहान आकाराचा तुकडा काढण्यात येतो, त्यामध्ये विषाणूंचा प्रादुर्भाव नसल्याची खात्री करून, प्रथम एका जेलमध्ये व नंतर कंपोस्टमध्ये त्यांची वाढ केली जाते.
- दोन इंच उंचीची रोपे झाल्यानंतर, त्यावर तिरका काप घेऊन कलम केले जाते. एकमेकांशी जुळून येईपर्यंत म्हणजे साधारणपणे एक आठवड्यापर्यंत क्‍लिपांनी जोडून ठेवले जाते.
- खालील बाजूला बटाटा रोपाची मुळे आणि वरील बाजूला टोमॅटोच्या फांद्या असे त्याचे स्वरूप ठेवले जाते.

...अशी झाली सुरवात - थॉम्पसन आणि मॉर्गन या बागकामविषयक कंपनीचे संचालक पॉल हॅन्सोर्ड यांच्या अमेरिका भेटीच्या वेळी पंधरा वर्षांपूर्वी टोमॅटो आणि बटाटा या रोपांचे कलम करण्याची कल्पना आली.
- त्या कल्पनेवर सातत्याने काम करत, त्यांनी कलम करण्याची प्रक्रिया निर्दोष करण्याचा प्रयत्न केला.
- हॉलंड येथील विशिष्ट प्रयोगशाळेमध्ये उत्पादन करण्यात येत आहे. त्यानंतर ती रोपे इंग्लंडमध्ये आणून हरितगृहामध्ये वाढविण्यात येतात. 40 लिटरच्या बॅगेमध्ये किंवा मोठ्या कुंड्यांमध्ये ही रोपे ठेवली जातात.
- 3.5 इंच उंचीची झाल्यानंतर "टोमटॅटो'च्या रोपांची विक्री करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment