Tuesday, 7 January 2014

दुग्ध प्रक्रिया उद्योगापूर्वी सर्वेक्षण महत्त्वाचे...

भारत जगात दुग्ध उत्पादनात आघाडीवर आहे. येत्या काळात दुधाची मागणी वाढती आहे, तर दुसऱ्या बाजुला आजही ग्रामीण भागात दुधाला शहरी भागाच्या तुलनेत हवा तितका दर मिळत नाही. देशाच्या एकूण दूध उत्पादनात 37 टक्के दूध हे दुग्धपदार्थांच्या प्रक्रियेसाठी वापरले जाते. यात 24 टक्के दूध हे अनियोजित क्षेत्रात वापरले जाते. येथेच दुग्धपदार्थांची गुणवत्ता सुधारण्यास खूप मोठा वाव आहे.

अनेक जिल्ह्यांत हजारो बचत गट, विविध आर्थिक उन्नतीचे गट कार्यरत आहेत. अनेक जिल्ह्यांत विविध योजनांमार्फत गाई, म्हशींचे वाटप केल्यामुळे दुग्ध उत्पादनात काही ठिकाणी वाढही झालेली दिसते. "फ्लश सीझन' म्हणजे जास्त दुधाच्या काळात तर गाईचे दूध अनेक डेअऱ्यांमध्ये नाकारले जाते किंवा अत्यंत कमी दर मिळतो. हे लक्षात घेऊन गावातील तरुण गट, तसेच महिला बचत गटांनी एकत्र येऊन आपल्या गावातील, तसेच आसपासच्या इतर गावांतील शेतकऱ्यांकडून अतिरिक्त दूध गोळा करून ते पुढे विक्रीकरता न पाठवता प्रक्रिया केल्यास चांगली किंमत मिळू शकते. फक्त गरज आहे ती तंत्रज्ञानाची जोड व स्वच्छ, शुद्ध, उत्तम दुग्धपदार्थ पुरवण्याची.

दुग्ध प्रक्रिया उद्योग सुरू करताना.... दूध प्रक्रिया करताना कुठले पदार्थ बनवावेत, यंत्रसामग्रीवर बराच खर्च करावा लागेल का, उत्पादित प्रक्रिया पदार्थ कोण घेणार, विक्री कशी करणार, पॅकेजिंगचे काय, ब्रॅंड तयार होईल का, असे अनेक प्रश्‍न व्यवसायास सुरवात करणाऱ्यांच्या मनात येतात. यासाठी पहिल्यांदा या उद्योगासंबंधी प्राथमिक अभ्यास महत्त्वाचा आहे.

दुग्धजन्य पदार्थांची मागणी - 1) गाव, शहर, निमशहर यानुसार पदार्थांची संख्या कमी-जास्त होऊ शकते. परंतु सर्वांगाने विचार केल्यास अनेक हॉटेल, ढाबे, जेवणाची कंत्राटे घेणारे, या सर्वांना पनीर, खवा, तूप, दही, चक्का इ. ठराविक प्रमाणात लागत असतो.
2) हॉटेल, ढाबे यांची पनीरसाठीची रोजची मागणी असतेच.
3) लग्नाच्या जेवणात गुलाबजाम, मिठाईसाठी खवा, चक्का, पनीर इ. आवश्‍यक असतो. शंभर माणसांसाठी गोड दुग्धपदार्थ- उदा. गुलाबजाम तयार करण्यासाठी अंदाजे पाच किलो खवा म्हणजेच 500 ते 700 माणसांसाठी 25 ते 35 किलो खवा हा कच्चा माल म्हणून लागेल. तसेच शंभर जणांसाठी जेवणासाठी एका भाजीत पनीर वापरावयाचे असल्यास साधारणपणे 10 किलो पनीर लागेल. थोडक्‍यात, बाजारपेठेत मागणी आहे. ही मागणी आपण शोधली पाहिजे.

विक्रीचे नियोजन - 1) कुठल्याही व्यवसायात मागणी एकदम वाढणार नाही. बचत गटांच्या विविध प्रदर्शनांतून, "ऍग्रोवन'ने भरवलेल्या प्रदर्शनातून स्टॉल्स लावल्यास मोठ्या प्रमाणात जाहिरात होऊन मागणी वाढते.
2) हॉटेल, ढाबे यांची दुग्धपदार्थांसाठीची रोजची मागणी असतेच.
3) लग्नसमारंभाची मागणी लक्षात घेऊन तेथील जेवण तयार करणाऱ्या आचारी लोकांशी संपर्क ठेवून अपल्या दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढविता येईल.
4) अशा प्रकारे मागणी वाढत गेल्यास आजूबाजूच्या शहरांतील शॉपिंग मॉल्स, सुपर शॉपी, दुकाने इ. ठिकाणी योग्य पद्धतीने पॅक केलेले दुग्धपदार्थ विक्रीसाठी ठेवता येतील.

यंत्रसामग्रीची गरज - 1) छोट्या यंत्रांचा वापर करून शेतकऱ्यांच्या गटांना दूध प्रक्रियेच्या दृष्टीने लघुउद्योगांकडे वळण्यास मोठी संधी आहे.
2) खवा, पनीर, पेढा, श्रीखंड, लस्सी, क्रीम सेपरेशनसाठी लहान स्वरूपातील यंत्रे उपलब्ध आहेत.
3) विविध पदार्थांसाठी वेगवेगळ्या क्षमतेची बांधणीची यंत्रे महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. आपल्या उत्पादनानुसार ती विकत घेता येतील.
4) खवा उत्पादनासाठी कमीत कमी 40 हजारांपासून ते 2.5 लाखांपर्यंत यंत्रे उपलब्ध आहेत. पनीरसाठी साधा पनीर प्रेस 15-20 हजार, तर न्यूमॅटिक प्रेस हा 50 हजार ते 2.5 लाखांपर्यंत मिळू शकेल.
5) दुधातील साय वेगळी करण्यासाठी क्रीम सेपरेटरची किंमत 25 ते 40 हजारांपर्यंत आहेत. सुरवातीस एक किंवा दोन पदार्थांसाठी लागणारी यंत्रे खरेदी करून, गरजेनुसार इतर पदार्थांच्या निर्मितीसाठी यंत्रे विकत घेता येतील.

पॅकेजिंगसाठी डबे - 1) विविध दुग्धपदार्थांसाठी पॅकेजिंग मटेरिअल निवडताना मूळ पदार्थ व पॅकेजिंग मटेरिअलची गुणवत्ता विचारात घ्यावी.
2) सध्या बाजारात सहज उपलब्ध होणारे पीव्हीसी किंवा पॉलिप्रॉपिलीनचे प्लॅस्टिकचे डबे बासुंदी, गुलाबजाम, श्रीखंड, रसगुल्ला इ. साठी वापरता येतील.
3) मिठाई ठेवण्यासाठी कागदापासूनची वेष्टने व प्लॅस्टिकचे वेगवेगळे प्रकार लॅमिनेट करून वापरता येतील.
4) अनेक प्रकारच्या प्लॅस्टिकची घनता, ताणशक्ती, ऑक्‍सिजनच्या प्रवेशक्षमतेमध्ये फरक असतो. या प्रकारच्या क्षमता तपासून त्या-त्या प्लॅस्टिकसंबंधी खात्री पटवता येते.
5) पनीर, मिठाईसाठी व्हॅक्‍यूम पॅकिंग वापरले जाते. नवीन तंत्रज्ञानामध्ये मॉडीफाइड ऍटमॉसफिअर पॅकेजिंग ऑक्‍सिजन ऍबसॉर्बर तंत्र उपलब्ध झाले आहे.

ब्रॅंडिंग महत्त्वाचे - 1) आपल्या उत्पादनाचा ब्रॅंड विकसित करण्यासाठी जाहिरातींबरोबरच स्वच्छ, शुद्ध, योग्य मूल्यवर्धित आणि पॅकेजिंग केलेले दुग्धपदार्थ तयार करणे खूप महत्त्वाचे आहे.
2) आजघडीला नवनवीन तऱ्हेने दुग्धपदार्थ उत्तमरीत्या पेश करून आपल्यासमोर येत आहेत. "मॉल' संस्कृतीमुळे एकच पदार्थ चार-पाच प्रकारे ग्राहकांसमोर येत आहेत.
3) बदलत्या जीवनशैलीमुळे पौष्टिक, शुद्ध, नैसर्गिक रंग आणि रसायनविरहित पदार्थांकडे कल वाढतोय. यासाठी स्थानिक उपलब्धतेनुसार दुग्ध पदार्थांत फळांचा वापर, कमी फॅटचे दुग्धपदार्थ, कमी कॅलरीजचे पदार्थ (कृत्रिम साखरेचा वापर), तंतुमय पदार्थांचा वापर अशा अनेक प्रकारे मूल्यवर्धन करता येईल.
4) दुग्धपदार्थ तयार करत असताना मिळणारे उप-उत्पादन- उदा.- स्किम मिल्क (फॅट नसलेले) जे साय काढल्यानंतर मिळते, निवळी जे पनीर, छाना तयार करताना मिळते, ताक इत्यादीवर छोटीशी प्रक्रिया करून विक्री करता येते. या प्रक्रियेच्या पद्धती अत्यंत सोप्या व सहज करता येण्याजोग्या आहेत.
5) ग्राहकाला उत्पादनाची गुणवत्ता पटवून दिली तर विक्रीत वाढ तर होईलच, तसेच ही माहिती "ब्रॅंड' बनवण्यासाठीही उपयुक्त ठरेल.

दुग्धपदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण - कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालयातील पशुशास्त्र व दुग्धशास्त्र विभागांत आयोजित होणारे मेळावे, प्रशिक्षण यातून दुग्धपदार्थ निर्मितीची माहिती मिळेलच, तसेच दुग्ध महाविद्यालय, पुसद, विविध जिल्ह्यांतील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये प्रशिक्षण, माहिती मिळेल. आणंद, गुजरात येथील प्रशिक्षण दुग्धतंत्र महाविद्यालय प्रसिद्ध आहे. येथे पाच-सहा दिवसांचे दुग्धतंत्रातील विविध प्रशिक्षण कार्यक्रम शेतकरी, डेअरीतील तंत्रज्ञ यांच्यासाठी सुरू असतात. प्रशिक्षण, भोजन, निवास यांचा खर्च धरून साधारणपणे प्रशिक्षण कालावधीनुसार 4 ते 10 हजार रुपये शुल्क आहे. याचबरोबरीने राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाना येथेही प्रशिक्षण मिळते.

संपर्क - डॉ. धीरज कंखरे - 9405794668
(लेखक कृषी महाविद्यालय, धुळे येथे कार्यरत आहेत.)


संदर्भ # सकाळ अग्रोवन   

No comments:

Post a Comment