Friday, 3 January 2014

टोमॅटो पिकाने दिली

कौटुंबिक अर्थव्यवस्थेला बळकटी एकत्रित कुटुंबातून मजूरटंचाईवर मात शेतीतील वाढती मजूरटंचाई ही शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या बनली आहे. ही समस्या बऱ्याच प्रमाणात दूर करण्यात रावते यशस्वी झाले आहेत. कुटुंबातील सहा सदस्यांकडे शेतीकामांच्या जबाबदाऱ्यांची विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे एका सदस्यावर कामाचा बोजा वाढत नाही.
संपूर्ण कुटुंब ऍग्रोवनचे वाचक आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य शिकलेले आहेत. आम्ही सर्व जणांनी ऍग्रोवन वाचूनच शेतीत बदल केले. टोमॅटो, मिरची, कोबी किंवा शेतमालाला कोणत्या बाजारपेठेत भाव आहे हे आम्हाला ऍग्रोवनमधूनच समजते. त्यानुसारच माल बाजारपेठेत पाठवतो. आम्हा परिवारासाठी ऍग्रोवन विठ्‌ठलच ठरला आहे, असे रावते बंधूंनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातील शहापूर बंजर (वडाची वाडी) हे एक हजार लोकसंख्येचे छोटेसे गाव. शेती हाच गावचा मुख्य व्यवसाय. गावात कापूस, मका या पारंपरिक पिकांसोबत नव्याने टोमॅटो, मिरची व कोबी ही भाजीपाला पिके घेतली जातात. शेतीशी नाळ जुळलेले गावातील तरुण नोकरीऐवजी शेतीलाच जास्त प्राधान्य देतात.

गावातील विकास, त्यांच्या पत्नी सौ. किरण, तसेच विलास व त्यांच्या पत्नी सौ. सुनंदा, आई सौ. चंद्रकला व वडील चंद्रभान रावते असे संपूर्ण कुटुंब एकत्रित शेती करते. पंधरा एकर शेतीत सात एकर कापूस, दोन एकर मका, एकरभर बाजरी व मूग, दीड ते दोन एकर टोमॅटो, उर्वरित दोन एकरांत कोबी, हिरवी मिरची व जनावरांसाठी हिरवा चारा घेण्यात येतो.

टोमॅटो शेती यंदा ठरली फायदेशीर शहापूर बंजर हे गाव काही वर्षांपासूनच टोमॅटोची शेती करते. रावते कुटुंब त्याला अपवाद नाही. त्यांच्याकडेही 2007 पासून सुमारे एक ते दोन एकरांत त्याची शेती होते. रावते कुटुंबीय पूर्वी पारंपरिक पद्‌धतीने शेती करायचे. जिरायती शेतीत कापूस, मूग आणि ज्वारी अशी पिके खरिपात घेतली जात. मात्र 2005 मध्ये खोजेवाडी धरणाचे काम पूर्ण झाले आणि जुनी विहीर पाण्याने तुडुंब भरली. याच वेळी गावातील अन्य शेतकरी भाजीपाला पिके घेत होते.
पाण्याची व्यवस्था झाल्याने रावते बंधूंनीही भाजीपाला लागवडीचा निर्णय घेतला. यात सुरवातीला टोमॅटो आणि हिरव्या मिरचीसह ढेमसे, भेंडी व कारल्याची लागवड केली. पहिल्याच वर्षात यश मिळाले अन्‌ उत्साह वाढत गेला. हाती पैसा खेळू लागला. भाजीपाला शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून 2008 मध्ये चार किलोमीटर पाइपलाइन करून सहा एकर शेतीही पाण्याखाली आणली.

यंदाचे वर्ष ठरले समाधानाचे हवामान अनुकूल असेल तर त्या वर्षी टोमॅटोचे उत्पादन चांगले मिळाले. पण रावते कुटुंबाला कधी अति पाऊस, कधी दुष्काळी परिस्थिती यामुळे कोणत्या ना कोणत्या वर्षी तरी नुकसानीला सामोरेही जावे लागले.
सन 2011 व 2012 ही वर्षे त्यांच्यासाठी अवर्षणाची ठरली. टोमॅटो उत्पादनात घट आली. यंदाच्या वर्षी मात्र पावसाने साथ दिली. त्यामुळे टोमॅटो पीकही चांगले फुलले.

सेंद्रिय खताला विशेष महत्त्व लागवडीपूर्वी दोन एकर क्षेत्राला तीन ट्रॅक्‍टर शेणखत टाकले. लागवडीवेळी 12 गोण्या गांडूळ खत दिले. त्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक्षमता, टवटवीतपणा व झाडांची वाढ चांगली होण्यास मदत झाली. जानकीदेवी बजाज ट्रस्टने 12 गोण्या गांडूळ खत मोफत दिले. यामुळे चांगला हातभार लागल्याचे रावते सांगतात. घरीच रोपे तयार केली. पावसाळ्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 20 जूनच्या आसपास लागवड केली. पिकाच्या वाढीच्या अवस्थेत ठिबक सिंचनाद्वारा 19:19:19, फळधारणा झाल्यानंतर 0:52:34 आदीं विद्राव्य खतांचा वापर केला. पीक साडेतीन महिन्यांचे झाल्यानंतर 12:32:16 दोन पोती, युरिया एक पोते व पोटॅशची दोन पोती मुळाशी देण्यात आली. कीड व रोगनियंत्रणाबाबत दक्षता घेतली. नागअळी, फळ पोखरणारी अळी यांचे रासायनिक नियंत्रण केले. कृषी सहायक बाळासाहेब सूळ, मारोती गवळी यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
: विलास रावते, 7875813989
: विकास रावते, 8408986592

पुढील तंत्रज्ञानाचा वापर ठरला फायद्याचा बेड पद्‌धतीने टोमॅटो आणि मिरचीची लागवड
ठिबकने संपूर्ण भाजीपाला शेतीला पाणी शेणखताचा नेटका वापर
रासायनिक खतांचे "काटेकोर' वेळापत्रक आंतरमशागतीला विशेष महत्त्व

टोमॅटोचे अर्थशास्त्रही ठरले फायद्याचे एकूण व्यवस्थापनातून दोन एकर क्षेत्रातून आतापर्यंत 1900 क्रेट म्हणजे 41 टन 800 किलो म्हणजे एकरी 20 टन 900 किलो टोमॅटोचे उत्पादन मिळाले. प्रति क्रेट वजन सरासरी 22 किलो आहे. उत्पादन खर्च सुमारे 65 हजार रुपये आला. वाहतुकीसाठी 50 रुपये प्रति क्रेटप्रमाणे 95 हजार रुपये खर्च आला.
सुरत, अमरावती, नांदेड, परभणी ,जळगाव, औरंगाबाद व पुणे या प्रमुख बाजारपेठांत विक्री केली.

पहिल्या काढणीदरम्यान प्रति क्रेट 420 रुपये, मध्यावरील काढणीवेळी 300 रुपये, सद्य:स्थितीत 550 रुपये, तर सरासरी 350 रुपये प्रति क्रेट म्हणजे प्रति किलो 15 रुपये दर मिळाला.

एकरी तीन लाख 13 हजार पाचशे रुपये उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता एकरी दोन लाख 81 हजार रुपये उत्पन्न हाती आले. एकूण क्षेत्रात अजून दीड महिना काही क्रेट उत्पादन हाती लागेल.

यापूर्वीचे उत्पादन थोडक्‍यात असे सन 2010एकरी 1200 क्रेट उत्पादन
2011पावणेदोन एकर क्षेत्र - 1600 ते 1800 क्रेट
2012दीड एकर - 800 क्रेटसंदर्भ # सकाळ अग्रोवन 

No comments:

Post a Comment